भाग्यरेषा बनली दहशतीचा मार्ग file photo
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway : भाग्यरेषा बनली दहशतीचा मार्ग

समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा हैदोस, ३ वर्षांत १५ हून अधिक लुटमारी !

पुढारी वृत्तसेवा

Robbers loot passengers on Samruddhi Highway

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : 'राज्याची भाग्यरेषा' म्हणून मोठ्या दिमाखात सुरू झालेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आता प्रवाशांसाठी 'दहशतीचा मार्ग' बनला आहे. गुळगुळीत रस्ता आणि वेगाचे आकर्षण यापेक्षा आता या महामार्गावर प्रवाशांच्या वाट्याला मृत्यूचे भय आणि दरोडेखोरांचा क्रूर थरार येत आहे.

नाशिकच्या सिन्नरजवळ संभाजीनगरच्या मिश्रा कुटुंबासोबत घडलेला प्रसंग महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेची चिरफाड करणारा आहे. २५ मिनिटाच्या या थरारात सर्वात भयानक बाब म्हणजे, हे सर्व घडत असताना महामार्गावरून प्रत्येक सेकंदाला वाहने सुसाट जात होती, पण मदतीसाठी एकही गाडी थांबली नाही. माणुसकीही त्या वेगासोबत निघून गेली. सलग तीन घटनानंतर यंत्रणा जागी झाली. पोलिस आणि एमएमआरडीए प्रशासन उपाययोजना करण्यासाठी सरसावल्याचे दिसून येत आहे. मात्र, नागरिकांच्या मनातील दहशत नाहीशी करणे मोठे आव्हान आहे.

बीड, पाथरीच्या कुख्यात टोळीचा हैदोस वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्र. १८, हडसपिंपळगावजवळ २६ ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास राहुरीचे उद्योजक साहिल सोनवणे यांची गाडी अडवून दरोडेखोरांनी अडीच तोळ्याची चेन लुटली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी किरण अजिनाथ गायकवाड (२५, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, बीड) याला अटक केली. दरम्यान, समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालणाऱ्या ८ ते १० दरोडेखोरांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सर्व बीड आणि पाथरी येथील कुख्यात गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेची ४ आणि वैजापूरचे १ पथक लागले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी दोन दिवसांपासून बीड आणि पाथरी येथे तळ ठोकून आहेत.

भीतीच्या सावटाखाली प्रवास

पोलिसांनी एका आरोपीला अटक केले असले तरी तरी प्रवाशांच्या मनातील धास्ती कमी झालेली नाही. समृद्धीवरून प्रवास करायचा की नाही? हा प्रश्न आता प्रत्येक सर्वसामान्य प्रवाशाला सतावत आहे. जोवर महामार्गावरील तुटलेले कुंपण दुरुस्त होत नाही आणि २४ तास पोलिसांच्या गाड्यांचे सायरन या रस्त्यावर घुमत नाहीत, तोवर समृद्धी महामार्ग हा दरोडेखोरांचाच 'समृद्ध' अड्डा राहील, हे वास्तव आहे.

महामार्ग पोलिस आहेत कुठे ?

या सर्व घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत, तिथली परिस्थिती दरोडेखोरांसाठी 'नंदनवन' बनली आहे. महामार्गाच्या दुतर्फा असलेले सुरक्षा कुंपण (कंपाऊंड) अनेक ठिकाणी तोडण्यात आले आहे. आजूबाजूला वाढलेले गवत, झाडी आणि पथदिव्यांचा पूर्ण अभाव यामुळे दरोडेखोरांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या महामार्गावर पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) का नाही? सुरक्षेची साधने आणि गस्त नसल्यानेच गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की ते आता भररस्त्यात लहान मुलांच्या जिवावर उठले आहेत-

मार्च २०२३ ते २०२६ घडलेल्या घटना

समृद्धीवर महामार्गाच्या उद्घाटनापासूनच दरोडेखोरांनी याला आपले सॉफ्ट टार्गेट बनवले आहे. ही गुन्हेगारीची मालिका अंगावर काटा आणणारी आहे. तीन वर्षात १५ पेक्षा जास्त लहान-मोठ्या लुटमारी आणि दरोड्याच्या घटना घडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT