Road work in MIDC finally begins
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीतील रस्त्यांची अनेक वर्षांपासून असलेली दयनीय दुरवस्था आता लवकरच सुधारणार आहे. याविषयी दैनिक मपुढारीफ्ने सातत्याने वाचा फोडल्याने त्याची दखल घेत अखेर एमआयडीसी प्रशासन आणि निकृष्ट कामे केलेले ठेकेदार हलले असून, त्यांनी उखडलेल्या आणि चाळणी झालेल्या एमआयडीसीच्या प्रवेश मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सोमवार (दि. २४) पासून सुरुवात केली आहे. आता रस्त्याची कामे दर्जेदार व्हावे, अशी ताकीदही ठेकेदाराला देण्यात आली आहे.
शहरासह मराठवाड्याच्या औद्योगिक प्रगतीची नवी दारे खुली करणाऱ्या शेंद्रा एमआयडीसीत सध्या काम मिळवायचे... ते निकृष्ट करायचे आणि पितळ उघडे पडलेच तर प्रशासनाच्या आशीर्वादाने पुन्हा थातूर-मातूर पॅचवर्क करून कागदोपत्री ओके मिळवून विषय संपवायचा, असले प्रकार बिनबोभाट सुरू आहेत. यामुळे फाइव्ह स्टार इंडस्ट्रीची पुरती वाट लागली आहे. या औद्यागिक वसाहतीमधील प्रवेश मार्ग असलेल्या ए.ओ, पी, क्यू, आर. या रस्त्याचे तब्बल ८ कोटी, ६७ लाख ९४ हजारांच्या निधीतून गतवर्षी रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले होते. मात्र काही निकृष्ट काम केल्याने सहा महिन्यांतच हा रस्ता उखडून जागोजागी खड्डे पडले. त्यावर थातूरमातूर पॅचवर्कची मलमपट्टी करण्यात आली.
तेही काम अत्यंत निकृष्ट झाल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती. यासह इतर रस्त्यांच्या दयनीय, दुरवस्थेबाबत दैनिक पुढारीने फाइव्ह स्टार नव्हे, स्लम औद्योगिक वसाहत ही वृत्त मालिका लावून धरली आहे. याची दखल घेत सोमवारपासून ठेकेदाराने ए.ओ.पी.क्यू.आर. या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.
स्थानिक उद्योजकांकडून समाधान
एमआयडीसीमधील नवीन रस्ते काही महिन्यांतच जागोजागी उखडल्याने आणि खराब झाल्याने उद्योजक, कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने हा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.
एकाचे काम सुरू तर दुसऱ्या ठेकेदाराला नोटीस शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील ए. ओ.पी. क्यू. आर. या प्रवेश मार्गाच्या दुरुस्तीचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले. आता रस्त्याचे काम चांगले आणि गुणवत्तापूर्ण व्हावे, याकडे लक्ष दिले जाईल. दुसऱ्या डी ब्लॉकमधील खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मापारी इन्फोप्रोजक्टला नोटीस बजावली आहे. तेही काम उद्यापासून सुरू होईल.- रमेशचंद्र गिरी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.
डी ब्लॉकमधील रस्त्याचे कामही उद्यापासून
रेडिको कंपनीसमोरील डी ब्लॉकमधील रस्त्याचे ५ कोटी, १३ लाख १६ हजार ०७ रुपयांच्या निधीतून मे. मापारी इन्फो, यांनी डांबरीकरण केले. मात्र हा संपूर्ण रस्ताही काही महिन्यांत जमिनीत रुतल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या दर्जाहीन कामांमुळे येथील रस्त्यांचा अक्षरशः धुराडा झाल्याचे वृत दे. प्मुढारीफ्ने प्रकाशित केले. याची तातडीने दखल घेत या रस्त्याच्या ठेकेदारालाही नोटीस बजावली असून, दोन दिवसांत त्या रस्त्याचे कामही सुरू करण्याची तंबी दिली आहे.