‘चटपटीत’ धोक्याचा घंटानाद Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ultra-Processed Food : अल्ट्रा प्रोसेस फूडमुळे अनेक आजारांचा धोका : डॉ. टाकळकर

शाळा परिसरात 'एचएफएसएस' पदार्थांवरील निर्बंधांचा निर्णय स्वागतार्ह

पुढारी वृत्तसेवा

Risk of various diseases due to ultra-processed foods: Dr. Takalkar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आधुनिक काळात बदलत्या जीवनशैलीत जंक फूड आणि वाढलेल्या अति-प्रक्रियाकृत अन्नामुळे (अल्ट्रा प्रोसेस फूड) लहान मुलांमध्ये लठ्ठपणासह टाईप-२ मधुमेह, फॅटी लिव्हर आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे आयएमएच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अनुपम टाकळकर यांनी सांगितले. त्यामुळे एफडीएकडून शाळा परिसरात चिप्स, वडापाव, समोसा यांसारख्या 'एचएफएसएस' (हाय फॅट, शुगर अॅण्ड सॉल्ट्स) पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

'द लॅन्सेट' या नियतकालिकातील अहवालानुसार भारतात सध्या ४.१ कोटींहून अधिक मुले जादा वजनाची किंवा लठ्ठपणाच्या विळख्यात आहेत. चिप्स, शीतपेये, क्रीम बिस्किटे, पिझ्झा आणि प्रक्रिया केलेल्या स्नॅक्समध्ये पोषक घटकांचा अभाव असतो, मात्र साखर, मीठ व चरबी प्रचंड प्रमाणात असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार एका व्यक्तीला दिवसाला २५ ग्रॅम साखरेची गरज असते, परंतु बाजारातील एकाच शीतपेयामध्ये ३५ ते ५० ग्रॅम साखर असते.

त्यामुळे वजनापेक्षा पोटाभोवती चरबी साचण्याचे प्रमाण जास्त असल्याने सामान्य वजन असलेल्या मुलांनाही मधुमेहाचा धोका असतो. बालपणी लठ्ठ असलेल्या ७० ते ८० टक्के मुलांमध्ये प्रौढ वयातही लठ्ठपणा कायम राहतो. पालकांनीही घरच्या डब्यात पोहे, उपमा, इडली, ढोकळा, मोड आलेली कडधान्ये व फळे देऊन मुलांना रोज किमान ६० मिनिटे मैदानी खेळांकडे वळवले पाहिजे, असे आवाहन डॉ. टाकळकर यांनी केले.

बालपणातच निरोगी सवयी

शाळा परिसरात वडापाव, समोसा किंवा चिप्स विक्रीवर बंदीचा निर्णय मुलांच्या भविष्यासाठी घेतलेला सार्वजनिक आरोग्याचा निर्णय आहे. मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा हा मधुमेह, हृदयविकार आणि फॅटी लिव्हरच्या संकटाची घंटा आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी आणि कमी खर्चिक असतो. मुलांच्या शाळेतील वातावरणात आरोग्यदायी अन्नाची निवड उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. निरोगी सवयी बालपणात रुजल्या, तर निरोगी भारत घडविण्याचे स्वप्न नक्कीच साकार होईल, असेही डॉ. टाकळकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT