छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाढती गॅस टंचाई, दरवाढ आणि रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ शहरातील सर्व ऑटो रिक्षा संघटनांनी रविवारी (दि.३०) मध्यरात्री बारा वाजेपासून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात सर्व संघटनांनी रविवारी एकमुखाने या आंदोलनाची दिशा ठरवली.
गॅसचा साठा उपलब्ध असेपर्यंत पंप २४ तास सुरू ठेवावेत, गॅस भरल्यानंतर अधिकृत पावती देणे बंधनकारक करावे, ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच गॅस साठ्याची माहिती पंपाच्या दर्शनी भागात ठळकपणे दर्शवावी, अशा मागण्या रिक्षा चालक संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आल्या आहे.
महाराष्ट्र वाहतूक सेना, भीम सेना रिक्षा संघटना, रोशन ऑटो रिक्षा युनियन, भीमशक्ती रिक्षा चालक संघ, मराठवाडा रिक्षा युनियन, ऑटो रिक्षा युनियन आणि कल्याणकारी वाहतूक संघटना यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या बैठकीस सलीम खामगावकर, बळीराम प्रधान, मोहिनी इनामदार, गजानन वानखेडे, मोहसीन शेख, इम्रान पठाण, शेख सरवर, दत्ता नागरे, वसीम सिद्दिकी, शरद वाडोरे, गौतम सूर्या, सय्यद कौशुद्दीन, रेखा सोनवणे, अनिता कटकुरे, मनोज साळवे, सोमनाथ साळवे, सय्यद अली आणि सय्यद मझहर आदी पदाधिकारी उपस्थित होते.