Sillod News : महसूल समाधान शिबीर : अकरा हजारांहून अधिक लाभार्थीना योजनांचा लाभ file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : महसूल समाधान शिबीर : अकरा हजारांहून अधिक लाभार्थीना योजनांचा लाभ

लोकाभिमुख कामकाजाची आ. अब्दुल सत्तार यांची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

Revenue Satisfaction Camp: More than eleven thousand beneficiaries benefit from schemes

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे सिल्लोड येथील डोंगरगाव फाटा परिसरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर उत्साहात पार पडले. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बालविकास, वन, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विभागांच्या विविध योजनांतर्गत ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थीना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले.

आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाच्या योजना प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता व तत्परतेने काम करावे, असे आवाहन केले. महसूल प्रशासन हे जनतेच्या विश्वासाचे केंद्र असून, भ्रष्टाचाराला थारा नसावा, असे सांगत शेतकरी, दिव्यांग, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा वेळेत लाभ मिळावा, यावर त्यांनी भर दिला. प्रलंबित पीक विमा दाव्यांचा प्रश्न येत्या विधिमंडळ अधिवेशनात शासनाकडे प्रभावीपणे मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी म्हाडा योजनेअंतर्गत सिल्लोडमधील बेघरांसाठी पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी शिबिरातील कामांचा आढावा मांडला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आणि तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी विभागीय योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमापूर्वी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी विविध शासकीय विभागांच्या स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनाची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, ता. कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार (सोयगाव), नायब तहसीलदार तुकाराम बनकर उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची अनुपस्थिती

लोकसभा पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने खासदार डॉ. कल्याण काळे यांची अनुपस्थिती स्वाभाविक मानली जात आहे. मात्र सिल्लोड येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला जिल्हाधिकाऱ्यांची अनुपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक व लाभार्थी उपस्थित असलेल्या या महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणे अपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी नेमक्या कोणत्या कारणामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT