Retired policeman's house broken into, thieves return empty-handed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सातारा परिसरातील सुधाकरनगरात चोरटे अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. महिनाभरात चार वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या मात्र तरीही पोलिसांची रात्रगस्त नसल्याने चोरांची हिम्मत वाढली आहे. सोमवारी (दि. २२) पहाटे चारच्या सुमारास गावी गेलेल्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे घर दोन चोरांनी फोडले. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले चोरीला काहीच न गेल्याने पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज घेऊन गुन्हाही नोंदविला नसल्याचे समोर आले आहे.
अधिक माहितीनुसार, निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षक गोपीचंद गव्हाणे (रा. सुधाकरनगर) हे कुटुंबासह घराला कुलूप लावून गावी गेले होते. सोमवारी पहाटे ३.५२ वाजता दोन चोरटे शिरले. टॉमीने खिडकी व कुलूप तोडून त्यांनी घरात शिरले. कपाटे फोडून घरात उचकापाचक केली. मात्र, गव्हाणे कुटुंबाने मौल्यवान ऐवज सोबत नेल्याने चोरांना रिकाम्या हाती परतावे लागले.
या प्रकरणी योगेश गव्हाणे यांनी सातारा पोलिसांकडे तक्रार दिली. परंतु पोलिसांनी चोरीस काहीही गेले नाही, असे सांगून गुन्हा दाखल न करता केवळ अर्ज घेतला. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. गुन्हा नोंद करून चोरट्याना पकडण्याचे सोडून पोलिसांनी टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी गव्हाणे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा अॅड. मयूर गव्हाणे यांनी चोरांचा पाठलाग केला होता. मात्र अंधारात चोरटे पसार झाले होते.
साऊथ रिपब्लिक सोसायटीत गेल्या महिन्यातच एसआरपीएफचे संदीप जिरे व अतुल झोडगे यांच्या दुचाकी चोरांनी पळविल्या. त्या दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद असूनही पोलिसांना अद्याप एकाही चोराला पकडता आलेले नाही.