Digital Arrest : सेवानिवृत्त ५ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर भामट्यांनी उकळले ११ लाख file photo
छत्रपती संभाजीनगर

Digital Arrest : सेवानिवृत्त ५ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर भामट्यांनी उकळले ११ लाख

अतिरेक्यांना फंडिंग केल्याची धमकी ; पोस्टातील १० लाखांची एफडी मोडायला लावली

पुढारी वृत्तसेवा

Retired individual held in 'digital arrest' for 5 days; cyber fraudsters swindle 11 lakh rupees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तुमच्या आधारकार्डचा वापर करून काढलेल्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, तो पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भीती दाखवून सायबर भामट्यांनी महाराष्ट्र विद्युत मंडळातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल ११ लाख रुपयांचा गंडा घातला. भामट्यांनी पोलिस गणवेशात व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट केली आणि वृद्ध कर्मचाऱ्याची पोस्टातील आयुष्यभराची पुंजी लुटली. हा प्रकार २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान हडको एन ११ भागातील नवजीवन कॉलनीत घडला.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या ६० वर्षीय सेवानिवृत्त वरिष्ठ ऑपरेटरच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास निवृत्त कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. मी डेटा प्रोटेक्शन ऑथॉरिटी ऑफ इंडियामधून बोलत आहे. नाशिक येथील रेणुकानगरमधून तुमच्या आधारकार्डवर एक सिमकार्ड खरेदी करून मुंबईतील कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले आहे.

त्या खात्यातून अतिरेकी कारवायांसाठी कोट्यवधी रुपये पाठवले जात असून, तुमच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत, असे सांगत भामट्याने घाबरवून सोडले. तक्रारदाराने आपला याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगताच, तुमची माहिती आम्ही नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्याला फॉरवर्ड करतो, असे म्हणून फोन कट केला.

११ लाख उकळले अन् पाठवली खोटी पावती

त्यानंतर भामट्यांनी त्यांना टीटीआर इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, शाखा- जहिराबाद) या चालू खात्याचा तपशील देऊन आरटीजीएसद्वारे ११ लाख रुपये पाठवण्यास भाग पाडले. पैसे वर्ग होताच आरोपींनी त्यांना आरबीआयची एक बनावट पोचपावती दाखवली. तुमचे पैसे आरबीआयकडे सुरक्षित जमा झाले असून, ८ ते १० दिवसांत चौकशी पूर्ण होऊन तुम्ही निर्दोष सिद्ध झाल्यावर सर्व रक्कम परत मिळेल. तोपर्यंत कुटुंबातील कोणालाही याची वाच्यता करू नका, अशी सक्त तंबी देऊन आरोपींनी फोन बंद केला.

वर्तमानपत्रातील बातमीने फुटले बिंग

६ ऑक्टोबर रोजी वर्तमानपत्रात डिजिटल अरेस्ट करून फसवणूक करणाऱ्या टोळीबाबतची बातमी वाचल्यानंतर आपलीही तशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे त्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या लक्षात आले आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर सिडको ठाण्यात गुन्हा नोंद झाला, अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल येरमे करत आहेत. नागरिकांची सतर्कता बाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

अटकेची भीती अन् व्हिडिओ कॉलवर लाईव्ह पाळत

अटक टाळायची असेल तर बँक खात्यांची आरबीआयकडून पडताळणी करावी लागेल, असा बनाव रचण्यात आला. त्यासाठी बँकेतील सर्व ठेवी, एफडी आणि आरडी एकाच खात्यात जमा करण्यास सांगितले. २९ सप्टेंबर रोजी आरोपींनी पुन्हा व्हिडिओ कॉल केला आणि कॉल कट करू नका, तुम्ही काय करत आहात ते आम्हाला दिसू द्या, असा सज्जड दम भरला. घाबरलेल्या अवस्थेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने तातडीने एन-७ सिडको येथील पोस्ट ऑफिस गाठले. आरोपी सतत व्हिडिओ कॉलवर पाळत ठेवून असतानाच, त्यांनी पोस्टातील आपली १० लाख रुपयांची मुदत ठेव मुदतीपूर्वीच मोडून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात वर्ग केले.

व्हिडिओ कॉलवर पोलिस ठाण्याचा सेटअप

अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच फिर्यादींना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्ती पोलिस ठाण्यासारख्या कार्यालयात पोलिस अधिकाऱ्याच्या खाकी गणवेशात बसलेली होती. मी पंचवटी पोलिस ठाण्याचा इन्स्पेक्टर संदीप राव बोलत आहे, असा तोतया पोलिसाने आव आणला. त्यानंतर स्क्रीन बंद ठेवून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संभाषण सुरू केले. अतिरेकी फंडिंगमध्ये तुमचा सहभाग असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलिसांमार्फत तुम्हाला तातडीने अटक करून कस्टडीत डांबावे लागेल, अशी धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT