

Sambhajinagar News: Only 11 days left for 'Gunthewari'
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या गुंठेवारी मोहिमेची अंतिम मुदत जवळ आली असून ११ दिवस शिल्लक असल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला गुंठेवारी कक्ष बंद करण्यात येणार असून, मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे महापौर समीर राजूकरकर यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे संचिका दाखल करण्यासाठी महापालिकेत गर्दी वाढली असून, दररोज ३०० ते ४०० अर्ज येत आहेत. या मोहिमेतून आतापर्यंत महापालिकेला ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे नियमित करण्यास मंजुरी दिल्यानंतर महापालिकेने जून २०२२ पासून ही मोहीम सुरू केली. मध्यंतरी सवलती बंद झाल्याने अर्जाची संख्या घटली होती.
मात्र, यंदा सवलती पुन्हा लागू केल्यानंतर अर्जाचा ओघ वाढला. १ एप्रिल ते ६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ६ हजार ३०६ संचिकांना मंजुरी देण्यात आली. त्यातून महापालिकेला ६७ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, गुंठेवारी मोहिमेचा आयुक्त अमोल येडगे दररोज आढावा घेत आहेत.
नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नगररचना विभागात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून, विविध प्रभागांत शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. तरीही अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असणे किंवा त्यात त्रुटी आढळणे, यामुळे नागरिकांना पुन्हा धावपळ करावी लागत आहे. मुदत संपण्यास अवघे काही दिवस उरल्याने गुंठेवारी कक्षातील गर्दी वाढली असून, कामकाज सांभाळताना कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुन्हा दिली जाणार नाही मुदतवाढ
गुंठेवारी नियमितीकरणासाठी महापालिकेने सर्व सवलती लागू करून नागरिकांना संधी दिली आहे. मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी ३१ ऑक्टोबर हीच अंतिम मुदत राहणार आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याची ठाम भूमिका महापौर समीर राजूकरकर यांनी मांडली आहे. त्यामुळे नियमितीकरणासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना उर्वरित दिवसांत संचिका दाखल करण्याची लगबग करावी लागणार आहे.