Jayakwadi : जायकवाडीच्या कालव्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू file photo
छत्रपती संभाजीनगर

Jayakwadi : जायकवाडीच्या कालव्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांचे आदेश; अनधिकृत उपसा केल्यास कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Restrictive orders imposed on Jayakwadi canals

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जायकवाडी धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सिंचनाचे आवर्तन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कालव्यांतून होणारा अनधिकृत पाणी उपसा आणि पाणी वितरण व्यवस्थेत हस्तक्षेप रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली असून त्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते न्यांनी मुख्य डावा व उजवा कालवा, त्यांच्या वितरिका आणि लघुवितरिकांसोबतच आपेगाव व हिरडपुरी उच्च पातळी बंधारा क्षेत्रात येत्या ११ जानेवारीपर्यंत अनधिकृत पाणी उपसाबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

जायकवाडीच्या मुख्य कालव्यांसह वितरिका आणि लघुवितरिकांद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. आवर्तनाच्या काळात पाण्याचे नियोजनबद्ध वितरण होणे आवश्यक असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कालव्यांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा करणे, कालव्याच्या नियंत्रण यंत्रणेत हस्तक्षेप करणे, कालवे तसेच संबंधित बांधकामांचे नुकसान करणे आणि पाणी वाटपाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यास मनाई केली आहे.

त्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकार विधाते यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (१) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रब्बी आवर्तनाच्या काळात कालवा परिसरातील पाणी वितरण व्यवस्थेचे काटेकोर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासमोर राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT