लेण्यांच्या विकास प्रकल्पातील समस्यांचे निराकरण करा file photo
छत्रपती संभाजीनगर

लेण्यांच्या विकास प्रकल्पातील समस्यांचे निराकरण करा

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Resolve the issues in the cave development project

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्यांच्या विकास प्रकल्पांतर्गत उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे. देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.

अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पातील पर्यटनाशी संबंधित समस्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व नोडल अधिकारी नीलेश गटणे, प्रादेशिक व्यवस्थापक योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक शॉपिंग प्लाझाचे व्यवस्थापक, लेणी संघटनांचे पदाधिकारी आणि पर्यटन अभ्यासक उपस्थित होते.

बैठकीत पापळकर यांनी अजिंठा टी-पॉइंट ते अजिंठा लेणी पायथा या मार्गावरील प्रदूषणमुक्त बस सेवेचा आढावा घेतला. पर्यटन हंगामात एसटी महामंडळाची ही बस सेवा अपुरी पडत असल्याने पर्यटकांना लेणी न पाहताच परत जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने तातडीने जादा ई-बस उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच, वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांना हॉकर्सचा त्रास होऊ नये यासाठी पोलिस विभागामार्फत पोलिस चौकी उभारणे, वेरूळ ते घृष्णेश्वर मंदिर मार्गावरील अतिक्रमणे हटवणे आणि पर्यायी रस्ता जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पाणी आणि रस्ते दुरुस्तीचे आदेश टी-पॉइंट ते लेणी पायथा या मार्गावरील खराब झालेल्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, तसेच रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या वन विभागाने छाटाव्यात, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. उन्हाळ्यात अजिंठा व्हा पॉइंट, अभ्यागत केंद्र आणि लेणी परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

व्हीआयपी असल्याची बतावणी केल्यास कारवाई

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लेणी परिसरातील पाणी, वीज व रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, अजिंठा-वेरूळ येथे काही जण मव्हीव्हीआयपीफ असल्याचे सांगून नियम मोडून प्रवेश मिळवण्यासाठी दबाव आणतात. तसेच काही बिनपरवाना मार्गदर्शक पर्यटकांची दिशाभूल करतात. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT