Samruddhi Highway : समृद्धीवर धारदार नोजल ठोकून दुरुस्तीचे काम; मध्यरात्री अनेक वाहनांचे टायर फुटले  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway : समृद्धीवर धारदार नोजल ठोकून दुरुस्तीचे काम; मध्यरात्री अनेक वाहनांचे टायर फुटले

बॅरिकेटिंग गायब; सुरक्षा यंत्रणा झोपेत; वाहनधारक संतप्त

पुढारी वृत्तसेवा

Repair work by hitting sharp nozzles on Samruddhi; Tires of many vehicles burst in the middle of the night

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान रस्त्यावरील सूक्ष्म तडे दुरुस्तीसाठी शेकडो धारदार नोजल ठोकून मेघा इंजिनिअरिंग कंपनीमार्फत ग्राऊटिंगचे काम करण्यात आले. मात्र योग्य बॅरिकेटिंग आणि सुरक्षा व्यवस्था न केल्याने मध्यरात्री नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या ३ ते ४ वाहनांचे टायर पंक्चर झाले. सुरुवातीला लुटमारीचा प्रकार समजून गोंधळ उडाला, मात्र नंतर हा दुरुस्तीच्या कामाचा भाग असल्याचे समोर आले. वाहनधारकांनी यामुळे तीव्र संताप व्यक्त केला.

महामार्गावर १०० ते १२० किमी प्रतितास वेगाने वाहने धावतात. अशा परिस्थितीत धारदार नोजल्स रस्त्यावर ठोकले जात असूनही योग्य खबरदारी न घेतल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका प्रवाशाने वाहनाचे टायर पंक्चर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर प्रकार उघडकीस आला. काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रवाशांनी पोलिसांवर रोष व्यक्त करत स्वतःच इतर वाहनधारकांना थांबवून सावध केले. नंतर पोलिसांनी धाव घेत बॅरिकेटिंग करून एका बाजूने वाहतूक सुरू केली. सकाळी प्रशासनाने नोजल्स कापून काढले. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग, केली. दौलताबाद ठाण्याच्या निरीक्षक रेखा लोंढे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

प्रशासन ठेकेदारावर फक्त दंड करून मोकळे

वाहनधारकांकडून टोल आकारला जातो, मात्र सुरक्षेच्या उपाययोजना मात्र धाब्यावर बसवल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे मोठा अपघात घडला असता तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. फक्त ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून प्रशासन वेळ मारून नेत असल्याची टीका होत आहे.

वाहनधारकांचे नुकसान

चार टायर पंक्चर झाल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. दुरुस्ती व नवीन टायर बसवण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. आम्ही टोलचे पैसे भरतो, तरीही जीव धोक्यात घालावा लागत आहे, असा रोष वाहनधारकांनी व्यक्त केला.

दुसऱ्या पर्यायाचा शोध सुरू

एखाद्या वाहनामुळे बौरकेट बाजूला झाल्याने दोन-तीन गाड्या दुरुस्तीच्या लेनमध्ये गेल्याने हा प्रकार घडला. मात्र, बॅरिकेट्स लावलेले होते. शिवाय घटनास्थळी महामार्ग पोलिस तात्कळ पोहोचले होते. आता ग्राऊटिंगऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक रूपाली दरेकर यांनी दिली.

रेल्वे रुळावर सिमेंट काँक्रीटचे तुकडे ठेवून घातपाताचा प्रयत्न

संभाजीनगरवरून जालन्याकडे जात असताना रेल्वे चालकाला रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार दिसला. सिमेंटच्या तुकड्याना रेल्वे इंजिनची कॅटल गार्डला टक्कर होऊन नुकसान झाले आहे. त्यानंतर आणखी एक मालगाडी जालन्याकडे जाताना काही अंतरावर हाच प्रकार घडला, त्यानंतर नंदीग्रामचा लोको पायलटने जालना स्टेशन मास्तरला माहिती दिली. मालगाडीच्या लोको पायलटने करमाडला कळविले होते. त्यानंतर कंट्रोलवरून अनुजकुमार यांना कळविण्यात आले.

मेघा इंजिनिअरिंग कंपनीला दुरुस्तीचे कंत्राट

समृद्धी महामार्गावरील ५४ किमी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हे मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला काम देण्यात आले आहे. अंडर पासच्या पुलावर काम सुरू होते. नोजल ठोकून त्याद्वारे केमिकल सोडण्यात आले होते. त्याला २४ तासांचा वेळ लागतो. त्यानुसार बुधवारी सकाळी ते काढण्यात आले. कंपनीने बॅरिकेट्स लावले होते, मात्र कुठल्यातरी वाहनाने ते तोडल्या गेले. पाठीमागून आलेल्या तीन गाड्या त्यावरून गेल्याने पंक्चर झाल्या. यापुढे दुरुस्तीचे काम करताना पोलिस दक्षता घेतील.

एमएसआरडीसीची कबुली

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील (साखळी क्रमांक ४२४०६५०) ठिकाणी सूक्ष्म तडे भरून काढण्यासाठी इपॉक्सी ग्राऊटिंगचे काम करण्यात आले होते. त्यासाठी अॅल्युमिनियम नोजल्स लावले होते. मंगळवारी रात्री १०:३० वाजता काम पूर्ण झाल्यानंतर काही वाहने डायव्हर्जन ओलांडून नोजल्सवर गेल्याने तीन गाड्यांचे टायर पंक्चर झाले. नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र ट्राफिक डायव्हर्जनची सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था नव्हती, असे एमएसआरडीसीने कबूल केले आहे. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे मुख्य अभियंता संगीता जैस्वाल व अधीक्षक अभियंता सतीश श्रावगे यांच्या पत्रकात नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT