Remove the encroachment, or else a hunger strike will have to be undertaken
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील आझाद चौक ते सिडको एन-८ मधील साखरे मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवैधरीत्या वाळू ठेले टाकले आहेत. या अतिक्रमणाविरोधात वारंवार तक्रार करूनही महापालिका अतिक्रमण हटाव विभाग कारवाई का करीत नाही. कारवाईनंतर पुन्हा वाळू ठेले टाकले जात असेल तर गुन्हे का दाखल होत नाही, अशी ओरड करीत आता उपोषण करावे लागेल, असे म्हणत सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेविका अड. माधुरी अदवंत यांनी सभापती अनिल मकरिये यांना आंदोलनाचा इशारा दिला.
महापालिकेत सोमवारी (दि.६) स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप पक्षाच्या सदस्यांनीच प्रशासनाला धारेवर धरले. शहराच्या प्रत्येक भागात सध्या अतिक्रमण आहे. मुख्य बाजारपेठेतच काय तर प्रत्येक रस्त्यावर आज पथविक्रेते आणि हातागड्या, टपाऱ्यांचे अतिक्रमण आढळून येत आहे. याविरोधात तक्रारी केल्यानंतर कारवाई होते, परंतु कारवाईनंतर पुन्हा त्याच ठिकाणी हातगाड्या आवतरतात. शहरातील आझाद चौक ते सिडको एन-८ च्या साखरे मंगल कार्यालयदरम्यानच्या रस्त्यावर दररोज मोठ्याप्रमाणात वाळूचे ठेले अढळून येते आहेत.
याविरोधात महापालिकेचे पथक कारवाई तर करतात, परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी किंवा पथक माघारी फिरताच पुन्हा वाळूचे ठेले जैसे थेच आढळून येतात. वाळू ठेलेधारक महिला, मुलींची छेड काढतात. या रस्त्याहून महिला, मुलींना जाणे-येणेही त्रासदायी बनले आहे. यामुळे या वाळू ठेल्याविरोधात कारवाई करण्यात यावी, नसता महापालिका मुख्यालयासमोर उपोषण आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेविका अड. माधुरी अदवंत यांनी स्थायी समिती सभेत दिला. त्यावर अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, नसता अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पदभार काढून इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात येईल, असा इशारा सभापती मकरिये यांनी दिला.
पथक नियुक्त केले
शहरातील विविध रस्त्यांवर वारंवार अतिक्रमण होत आहेत. त्यामुळे या १२ रस्त्यांवर सकाळपासून रात्रीपर्यंत गस्त घालण्यासाठी फिरते पथक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असून, ते पुरविण्यात यावे, अशी मागणी अतिक्रमण विभाग प्रमुख तथा मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी केली. त्यास सभापती अनिल मकरिये यांनी मंजुरी दिली.
प्रत्येक रस्ता अतिक्रमित
शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण आहे. हर्मूल कारागृह ते एकतानगर, शहानुरवाडी चौक ते सूतगिरणी मार्ग या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वारंवार अतिक्रमण होत असेल तर गुन्हे दाखल करा, अशी मागणी सदस्य राजगौरव वानखेडे यांनी सभापतींकडे केली.