Registration of every property worth more than Rs 100 is mandatory
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शंभर रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या प्रत्येक मिळकतीची दस्त नोंदणी करणे अनिवार्य आहे. अशी नोंदणी केली तरच मिळकतीचा मालकी हक्क सुरक्षित राहण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी दस्त नोंदणीची काळजी घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव यांनी केले आहे. तसेच फसवणूक टाळण्यासाठी मिळकतीच्या सर्व पूरक कागदपत्रांची स्वतः पडताळणी करूनच दस्त नोंदणी करावे, असेही भालेराव यांनी म्हटले आहे.
उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरसोबतच लातूर विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यात मागील काही वर्षांत मिळकतीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार तेजीत सुरू आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाचा महसूल वाढला आहे. परंतु अजूनही अनेक मिळकतींचे हस्तांतरण अनोंदणीकृत पद्धतीने होते. त्यामुळे भविष्यात मालकी हक्कांबाबत समस्या निर्माण होऊन नागरिकांची फसवणूक होते. याचा उल्लेख करुन उपमहानिरीक्षक भालेराव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नोंदणीकृत पद्धतीनेच मिळकतीचे हस्तांतरण करण्याचे आवाहन केले आहे. भालेराव यांनी सांगितले की, कायद्यानुसार दस्त नोंदणी अनिवार्य आहे.
दस्त नोंदणी केली तरच मिळकतीचा हक्क सुरक्षित राहू शकतो. नियमानुसार शंभर रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या सर्व मिळकतींची दस्त नोंदणी अनिवार्य आहे. अनोंदणीकृत पद्धतीने केलेल्या खरेदी विक्री व्यवहाराला कायद्याने कुठलाही आधार नसतो. भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास न्यायालयातही दाद मागता येत नाही, असेही भालेराव यांनी सांगितले.
विविध व्यवहारांसाठी शंभर रुपये, पाचशे रुपये आदी किमतीच्या बॉण्डची गरज भासते. त्यासाठी शासनाने बॉण्ड विक्रीचे परवाने दिलेले आहेत. बऱ्याचवेळा बाजारात बॉण्डचा तुटवडा भासतो. परंतु नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने डिजिटल बॉण्डही उपलब्ध करून दिलेले आहेत. मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक शुल्काचा भरणा करून तुम्हाला हवे तेवढे आणि हव्या तेवढ्या रकमेचे डिजिटल बॉण्ड मिळविता येतात.
रजिस्ट्री कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी नागरिकांना जास्त वेळ बसावे लागू नये म्हणून मोठ्या शहरांच्या ठिकाणी रजिस्ट्री कार्यालयात टोकन सिस्टीमची सुविधा देण्यात आली आहे. दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना टोकन दिले जाते, त्यामुळे ठरलेल्या वेळेत येऊन दस्त नोंदणी करता येते, अशी माहिती उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना हे तीन जिल्हे येतात. मागील वर्षी या विभागाला १२८० कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या कालावधीत तिन्ही जिल्ह्यांत मिळून तब्बल १ लाख ९३ हजार ८७३ दस्तांची नोंदणी झाली. त्यातून १०६७ कोटींचा महसूल प्राप्त झाला.