छत्रपती संभाजीनगर : कुख्यात गुन्हेगार जेलची हवा खात असताना त्यांना न्यायालयात हजर करताना, वैद्यकीय तपासणीसाठी नेताना किंवा पंचनाम्यासाठी फिरवताना त्यांचे व्हिडिओ शूट करायचे... त्याला भडक आणि दहशत निर्माण करणारे संगीत जोडून 'भाईगिरी'चे रील्स व्हायरल करायचे, हा खेळ आता गल्लीबोळातील पोरांना महागात पडणार आहे. सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या या पिल्लावळींवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
रील्स बनविणारा आता ज्या गुन्हेगाराचे समर्थन करेल, त्या गुन्हेगारावर दाखल असलेल्या मकोका, एमपीडीए, एनडीपीएस किंवा गंभीर गुन्ह्यात या रील्सबाजाला थेट सहआरोपी केले जाणार आहे. सिंडिकेटचा भाग म्हणून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परिणामी 'भाई'चे समर्थन करणे आता थेट तुरुंगाचा रस्ता दाखविणारे ठरणार आहे. शहरात दहशत माजवणारे टिप्या, पवन दिवेकर, तेजा, मुकेश साळवे, विकी हेल्मेट यासारखे कुख्यात गुन्हेगार टोळ्या चालवतात.
ते जेलच्या आत असताना बाहेर त्यांचे समर्थक आणि पंटर सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांची खाती चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. जेलबाहेर, न्यायालयाच्या आवारात आणि भररस्त्यात या गुन्हेगारांचे पोलिसांसोबतचे व्हिडिओ काढून समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जातो. यावर सायबर पोलिसांनी धडक मोहीम उघडून शहरातील तब्बल २२० कुख्यात आणि सराईत गुन्हेगारांच्या नावाने चालविली जाणारी सोशल मीडिया खाती शोधून काढली आहेत. त्यावरील आक्षेपार्ह आणि दहशत पसरविणारे रील्स पोलिसांनी तात्काळ हटवून खाती बंद केली असल्याची माहिती सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी
व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणारे गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. कोणीही सोशल मीडियाद्वारे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असेल तर त्याला सोडले जाणार नाही. रील्स बनविणारा ज्या गुन्हेगाराचे समर्थन करेल, त्या गुन्हेगारावर दाखल असलेल्या गुन्ह्यातही सहआरोपी करण्यात येईल.प्रवीण पवार, पोलिस आयुक्त
४० रील्सबाजांना सायबर ठाण्यात बोलावून झापले
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत सायबर पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सायबरचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सोमवारी (दि. २७) शहरात भाईगिरीचे रील्स बनविणाऱ्या आणि ते व्हायरल करणाऱ्या ४० जणांना सायबर ठाण्यात बोलावून सज्जड दम भरला आहे. यापुढे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ, घातक शस्त्रांचे प्रदर्शन किंवा धमकावणारे स्टेट्स ठेवल्यास कोणतीही गय केली जाणार नाही, असा थेट इशाराच पोलिसांनी दिला आहे
१० वर्षांच्या शिक्षेची तरतूद
केवळ रील्स डिलिट करून आता पोलिस थांबणार नाहीत; तर गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्यांना त्याच संघटित गुन्हेगारी टोळीचा (सिंडिकेट) भाग मानून थेट सहआरोपी केले जाणार आहे. मूळ गुन्हेगारावर मकोका, एमपीडीए, एनडीपीएस किंवा इतर गंभीर कलमे असतील, तर रील्स बनविणाऱ्यांवरही त्याच कायद्यांन्वये गुन्हे दाखल केले जातील. यात तब्बल १० वर्षांपर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कलमांचा वापर केला जाणार आहे.