Recruitment for 224 posts in Municipal Corporation soon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील रिक्त विविध १२ प्रवर्गाच्या २२४ पदांच्या बिंदूनामावलीला विभागीय आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली असून, मनपा निवडणुकीपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेत विविध प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुमारे ५ हजार पदे मंजूर आहेत. मात्र १५-२० कर्मचारी दरमहिन्याला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मनपात कायम कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून, रिक्त पदे भरण्यासाठी मनपाने शासनाकडे परवानगी मागितली होती. यासह बिंदूनामावली तयार करून विभागीय आयुक्तांकडे मजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला विभागिय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे महापालिकेकडून भरती प्रक्रियासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. यात तब्बल २२४ पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी मनपाकडून सुरू झाली आहे. त्यासाठी आयबीपीएस एजन्सीमार्फत भरतीसाठीचे अर्ज मागवण्यासह ऑनलाईन परीक्षा घेणे, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे आदी प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. तसेच कागदपत्रांची छाननी करून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज मागविण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आठ ते पंधरा दिवसांत जाहिरातीची शक्यता
मनपाच्या या भरती प्रक्रियेसाठी आठ ते पंधरा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यात उप अग्निशमन अधिकारी पदासाठी ४, अग्निशामक (फायरमन) १०० पदे, अभियंता ३२, कनिष्ठ अभियंता २४, अनुरेखक ९, रोखपाल १२, उद्यान सहाय्यक ६, स्वच्छता निरीक्षक १२ यासह विविध प्रवर्गातील पदे भरली जाणार आहेत.