Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Reservation : सगळीकडे आनंदी आनंद गडे

प्रभागामुळे आरक्षण सोडतीत सर्वांनाच संधी, दिग्गजांसह सर्व इच्छुकांत जल्लोष
छत्रपती संभाजीनगर
मनपा निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत काढताना शालेय विद्यार्थिनींसह मनपा आयुक्त जी श्रीकांत, उपायुक्त विकास नवाळे यांच्यासह व्यासपीठावरील अधिकारी व कर्मचारी. (छाया: सचिन लहाने)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आरक्षण सोडत पार पडली. यंदा प्रथमच प्रभाग पद्धतीत निवडणुका होत आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतरही सगळीकडे उत्साहासह आनंदी वातावरण दिसून आले. या सोडतीत माजी महापौर नंदकुमार घोडेले, भगवान (बापू) घडामोडे, माजी सभापती दिलीप थोरात, उपमहापौर राजू शिंदे या दिग्गजांचे पारंपरिक वॉर्ड महिलासाठी आरक्षित झाले. परंतु, त्याच अथवा लगतच्या प्रभागातून संधी उपलब्ध होत असल्याने सर्वत्रच जल्लोष दिसून आला.

विद्यापीठात सकाळी प्रशासक जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय पारदर्शकरीत्या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. तब्बल दहा वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने सोडतीच्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये जल्लोष दिसून आला. महापालिकेने तयार केलेल्या व निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या २९ प्रभागांतून ११५ उमेदवारांसाठी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा ओबीसी प्रवर्गाच्या जागा निश्चिती करण्यात आल्या. त्यासाठी सोडत काढून ३१ जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर आयोगाने ठरवून दिलेल्या नियमावलीचा आधार घेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग आरक्षित करण्यात आले. त्यासाठी २०११ च्या जन-गणनेतील लोकसंख्येचा आधार घेण्यात आला. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी २२ जागा आरक्षित करण्यात आल्या. तर अनुसूचित जमातीसाठी २ जागा निश्चित करण्यात आल्या. दरम्यान, या प्रक्रियेनंतर महिलांच्या आरक्षणाला सुरुवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात महिलांसाठी आरक्षित वॉर्ड निश्चत करण्यात आले. त्यासाठी देखील आयोगाने जी नियमावली ठरवून दिली होती. त्याचा आधार घेत प्रक्रिया राबविण्यात आली. यात काहींचे पारंपरिक वॉर्ड हे महिलांसाठी तर काहींचे ओबीसीसाठी आरक्षित झाले. त्यामुळे सर्वसाधरण प्रवर्गातील उमेदवारांना इतर प्रभागात जागांचा शोध घ्यावा लागणार आहे. एमआयएममधील बहुतांश उमेदवारांवर हे संकट कोसळल्याचे सोडतीत दिसून आले.

दहा वर्षांनंतर निवडणुका

या ना त्या कारणाने लांबलेल्या महापालिकेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षांनी होत आहे. यंदा प्रथमच प्रभागांनुसार निवडणुका होत असून चान सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सोडतीत आरक्षण निघाले तरी त्याच अथवा लगतच्या प्रभागातून संधी उपलब्ध होत असल्याने दिग्गजांसह सर्व इच्छुक जल्लोषात असल्याचे दिसून आले.

महिलांची उदासीनता

महापालिका निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. तसेच १० वर्षांनंतर महापालिकेच्या सार्वत्रिक २ निवडणुका होत असतानाही विविध राजकीय पक्षांतील इच्छुक महिलांची आरक्षण सोडतीला अतिशय कमी उपस्थिती दिसून आली.

शिवसेना ठाकरे गटाची पाठ

शिवसेना ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी मंगळवारी झालेल्या आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. केवळ माजी नगरसेवक सीताराम सुरे, हरिभाऊ हिवाळे, मंगेश भाले वगळता दिग्गजांनी घर बसल्या ऑनलाईन आरक्षण सोडतीवर लक्ष ठेवल्याचे दिसून आले.

भाजप-शिवसेनेत उत्साह

आरक्षण सोडतीवेळी सर्वच राजकीय पक्षांचे एकदोन माजी नगर-सेवक उपस्थित होते. परंतु, भाजप बापू घडामोडे, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, संजय चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ, किशोर नागरे, स्वाती नागरे, रुपचंद वाघमारे, काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप यांच्यासह माजी नगरसेवक व इच्छुक उपस्थित होते. एवढेच नव्हे तर प्रत्येकांमध्ये सोडतीवेळी कमालीचा उत्साह दिसून आला. जोरदार घोषणा देत नाट्यगृह दणाणून टाकला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news