Rebellion begins in BJP before alliance decision
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, शहराध्यक्षांना विचारल्याशिवाय इच्छुकांनी अर्ज भरू नये, असे आदेश दोन दिवसांपूर्वीच भाजपचे नेते तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिले होते. मात्र, त्यानंतर लागलीच दुसर्याच दिवशी चार प्रभागांतून सुमारे १० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत अप्रत्यक्षरीत्या पक्षाला बंडखोरीचा इशाराच दिला आहे. त्यामुळे आता नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
महापालिकेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षांनंतर होत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक इच्छुक असल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी सहा-सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. अनेकांनी तब्बल ३० ते ४० वेळा वॉर्ड पिंजून काढले. मात्र, ऐन निवडणुका जाहीर होताच दोन्ही पक्षाने युतीत निवडणूक लढण्याचे जाहीर केले. त्यामुळे तयारी करून निवडणूक लढण्यासाठी सज्ज असलेले इच्छुक संकटात सापडले आहेत. प्रभागपद्धतीत निवडणूक होत असली तरी बर्याच उमेदवारींनी आपापले पॅनल तयार करून प्रचाराला सुरुवात केली आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी मुंबईतील एका प्रवेश सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरातील पदाधिकाऱ्यांना युतीचा निर्णय लवकर घ्या, निवडणूक युतीतच लढायची, असे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून युतीसाठी जोरबैठका सुरू आहेत.
त्यात दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यात पक्षाचे नेते मंत्री सावे हे इच्छुकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अनेकांनी अर्जही घेतल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, अर्जाचा अभ्यास करा, तो भरू नका, असे म्हणत बंडखोरी न करण्याचे आदेश त्यांनी इच्छुकांना दिला. परंतु, पक्ष आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष करीत १० इच्छुकांनी शनिवारी उमेदवारी अर्ज भरले.
या प्रभागातून अर्ज दाखल महापालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी विविध प्रभागांतून अर्ज दाखल झाले. प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. वर प्रभाग क्रमांक ९ मधून २, प्रभाग क्रमांक २२ मध्ये १. प्रभाग क्रमांक २० मध्ये २ आणि प्रभाग क्रमांक २९ मध्ये २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.