Sambhajinagar News : दस्त नोंदणीच्या २० लाखांवरील व्यवहारांची फेरतपासणी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दस्त नोंदणीच्या २० लाखांवरील व्यवहारांची फेरतपासणी

उपमहानिरीक्षकांनी मागवली माहिती, महसूल बुडाल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

Re-examination of transactions above 20 lakhs of dast registration

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मालमत्ता खरेदी - विक्रीच्या असंख्य व्यवहारांमध्ये कमी मूल्य दाखवून मोठ्या प्रमाणावर महसूल बुडविला जात आहे. शहर आणि जिल्ह्यात असे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नोंदणी उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी दुय्यम निबंधक कार्यालयांकडून मागील काही महिन्यांमध्ये त्यांच्याकडे नोंदविलेल्या २० लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या दस्तांची माहिती मागविली आहे. या सर्व व्यवहारांची नगर रचनाकार यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

नियमानुसार जमीन, घर, फ्लॅट, शेती यासह सर्व स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारांची दस्त नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी राज्यात जिल्हा आणि तालुक्यांच्या ठिकाणी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यात आलेली आहे. दस्त नोंदणीसाठी त्या मालमत्तेची जेवढी किंमत आहे, त्याच्या ७ टक्के इतके मुद्रांक शुल्क आकारले जाते. परंतु बर्याच व्यवहारात कमी किंमत दाखवून दस्त नोंदणी केली जाते. त्यामुळे मुद्रांक शुल्कही कमी भरावे लागते.

विशेषतः छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातील मालमत्तांच्या नोंदणीत असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही व्यवहारांमध्ये रेडीरेकनरपेक्षा कमी मूल्य दर्शवून किंवा पळवाटा काढून दस्त नोंदणी झाल्याचे सांगण्यात येते. याबाबत नोंदणी उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांच्याकडे काही जणांनी प्रकरणनिहाय तक्रार केली.

त्यामुळे आता भालेराव यांनी छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांकडून २० लाखांवरील व्यवहारांची माहिती मागविली आहे. या दस्तांची माहिती आल्यानंतर नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयातील नगर रचनाकार यांच्यामार्फत त्याची पडताळणी केली जाईल, त्यात काही गडबड आढळली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे भालेराव यांनी सांगितले.

जिल्ह्यात १३ कार्यालये

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दस्त नोंदणीचे १३ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्यातील पाच कार्यालये ही एकट्या छत्रपती संभाजीनगरात असून, उर्वरित आठ कार्यालये ही तालुक्यांच्या ठिकाणी आहेत. शहरातील पाचही कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने दस्त नोंदणी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT