जायकवाडीतील पाणीपातळीत झपाट्याने घट pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Jayakwadi dam water level : जायकवाडीतील पाणीपातळीत झपाट्याने घट

उन्हाच्या तीव्र झळांमुळे धरणातील दररोज सुमारे 2.124 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण तालुक्यात जसजसे तापमानाची तीव्रता अधिक जाणवत आहे, तसतसे यंदाच्या उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा फटका थेट जायकवाडी धरणाला बसत आहे. तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. परिणामी पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

उन्हाच्या तीव्र झळांमुळे धरणातील दररोज सुमारे 2.124 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. आतापर्यंत 17 दलघमी (11.19 टीएमसी) पाण्याची वाफ होत आहे. विशेष म्हणजे एका दिवसात होणारे बाष्पीभवन हे वाळूज, जालना व छत्रपती संभाजीनगर औद्योगिक क्षेत्रासह विविध पिण्याच्या पाणी योजनांची सहा दिवसांची गरज भागवेल इतके असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जायकवाडी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शेती सिंचन, औद्योगिक वापर तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, मात्र वाढलेल्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन सुरू झाले आहे. जलसाठ्यावर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर, वाळूज, शेंद्रा, जालना औद्योगिक वसाहतींसह अंबड, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, गेवराई, गंगापूर आदी भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच शेती सिंचनासाठीही धरणाचे पाणी महत्त्वाचे मानले जाते. मात्र वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्याचा वेगाने होणारा ऱ्हास भविष्यात चिंतेचा विषय मात्र ठरू शकतो.

बाष्पीभवन मापन यंत्र

धरण निर्मतीिच्या काळात बसविण्यात आलेल्या बाष्पीभवन मापन यंत्राद्वारे दररोज पाण्याच्या बाष्पीभवनाची नोंद घेतली जाते. सध्या धरणात 41.15 टक्के जलसाठा उपलब्ध असून गतवर्षी याच दिवशी हा साठा 32.31 टक्के होता.

धरणाची सध्याची पाणीपातळी 1509.17 फूट (459.995 मीटर) असून एकूण पाणीसाठा 1631.439 दलघमी आहे. त्यापैकी जिवंत पाणीसाठा 893.333 दलघमी इतका आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरळीत चालतील इतका मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एका दिवसात सहा दिवस पुरेल इतक्या पाण्याचे बाष्पीभवन

वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून, एका दिवसातच पिण्याच्या पाणी योजना व औद्योगिक क्षेत्राला सहा दिवस पुरेल इतक्या पाण्याची वाफ होत आहे. उष्णतेचा पारा आणखी वाढल्यास बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या नैसर्गकि प्रक्रियेवर नियंत्रण मिळविणे कठीण असले तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, धरण अभियंता मंगेश शेलार व तंत्रज्ञ गणेश खराडकर यांनी केले आहे.

पाऊसमान सरासरी होण्याची शक्यता

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊसमान सरासरी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविल्याने काही प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आतापासूनच धरणातील पाण्याचे योग्यरीत्या नियोजन करणे गरजेचे आहे. उन्हाळी हंगामासाठी जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. या विसर्गामुळेही धरण साठ्यात वेगाने घट होत असून, येणाऱ्या काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT