Jat Water Crisis : जतच्या हक्काचे पाणी सांगोला, मंगळवेढ्याला पळवले

तम्मनगौडा रवी यांचा आरोप : जत, मंगळवेढ्याच्या आमदारांचे साटेलोट ः जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Jat Water Crisis
जतच्या हक्काचे पाणी सांगोला, मंगळवेढ्याला पळवले
Published on
Updated on

सांगली ः म्हैसाळ योजनेचे जतच्या हक्काचे पाणी मंगळवेढा आणि सांगोलाला पळवले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी पाणी संकटात सापडला आहे. जत आणि मंगळवेढ्याच्या आमदारांचे साटेलोटे असल्याने जत आमदारांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवी- पाटील यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याबाबत तक्रार केली आहे.

ते म्हणाले, बोअरवेलची पाणीपातळी खालावल्यामुळे जत तालुक्यात शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. अशा परिस्थितीत म्हैसाळ योजनेचे जतच्या वाट्याचे हक्काचे पाणी सोडणे गरजेचे आहे. पाण्यासाठी शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासनाने तत्काळ पाणी न सोडल्यास हातातोंडाला आलेली पिके करपून जाण्याची भीती आहे. मात्र जतचे आमदार आणि मंगळवेढ्याचे आमदार यांच्यात साटेलोटे आहे. त्यामुळेच जतच्या हक्काचे पाणी सांगोला मंगळवेढ्याला पळवून नेऊन जतच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जत तालुक्यातील शेतकरी सध्या पाणी आणि विजेच्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे.

येत्या काही दिवसांत जत तालुक्याला म्हैसाळचे हक्काचे पाणी न मिळाल्यास आणि वीजपुरवठा सुरळीत न केल्यास, जत तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला. यावेळी महादेव अंकलगी, पंचायत समिती सदस्य सचिन होर्तीकर, उमदी जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष पाटील, बसवराज हळकी, रामलिंग निवर्गी, प्रदीप करगणीकर, निवृत्ती शिंदे, माजी सरपंच उमदी आदी उपस्थित होते.

शेतीला सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी

शेतीला पाणी देण्यासाठी विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. महावितरणकडून शेतीसाठी दिला जाणारा थ्री-फेज वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला आहे. वारंवार वीज खंडित होणे आणि कमी दाबामुळे कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पिकांना वेळेवर पाणी देता यावे यासाठी शेतकऱ्यांना सलग आणि सुरळीत श्री-फेज वीजपुरवठा सायंकाळी 6 ते 10 या वेळेत देण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news