Raksha Bandhan of the Swadhyay family
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा देवच आपले खरे रक्षण करू शकतो आणि तोच जीवनाचा आधार आहे, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी यांनी केले. परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने आयोजित स्वाध्याय परिवारातर्फे शनिवारी (दि.९) सिडको महानगर वाळूज येथे रक्षाबंधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील हजारो स्वाध्याय परिवारातील बांधवांनी हजेरी लावली.
दीदी पुढे म्हणाल्या, केवळ शरीराचेच नव्हे, तर मनाचे आणि बुद्धीचे रक्षण होणेही आवश्यक आहे. समर्थ जो आहे तोच आपले रक्षण करू शकतो, आणि असा समर्थ फक्त देवच आहे. समाजात माणसामाणसातील नाती दृढ करण्यासाठी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकात देव आहे, ही भावना रुजणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ढोल-ताशांच्या गजरात व शंखनादात दीदींचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर आगमनानंतर भगवंत आणि दादाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रारंभी स्वाध्याय युवक-युवतींनी भावगीतावर आधारित नृत्यवंदना सादर केली. पावसात आणि मैदानावरील चिखलातही ही नृत्यवंदना उत्साहाने पार पडली.
उत्सवासाठी खास व्यासपीठावर आकाश आणि सूर्यरूपी राखीचे आकर्षक सजावट, जुन्या साड्यांपासून बनवलेली भव्य राखी, तसेच टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून मैदानाची सजावट करण्यात आली होती. पाच प्रवेशद्वार आणि पार्किंगची सुयोग्य व्यवस्था, तसेच स्वाध्याय कृतिशील बांधवांकडून वाहन व सुरक्षा नियोजन करण्यात आले.
रक्षाबंधन उत्सवाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यातील प्रत्यक्ष गावामध्ये ८ हजार ५०० कृतिशील स्वाध्यायी यांनी भक्ती फेरी काढली होती. त्यातील काही जणांनी भक्तिफेरीदरम्यान आलेले अनुभव आपल्या मनोगतामधून व्यक्त करताना एका कृतिशील स्वाध्यायींनी हा रक्षाबंधन उत्सव तब्बल २१ वर्षांनंतर होत असल्याचे सांगितले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
रक्षाबंधन उत्सव कार्यक्रमादरम्यान एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या वतीने जवळपास १५ पोलिस अधिकारी, १०० पोलिस अंमलदारानी चोख बंदोबस्त ठेवला होता. याचबरोबर १ हजार ३०० कृतिशील स्वाध्यायी वाहतूक व्यवस्था, मदत कार्य यासह इतर वाटून दिलेली कामे शिस्तबद्ध पद्धतीने करताना दिसून आली.
चिखलमय मैदानात स्वाध्यायींच्या शिस्तीने लक्ष वेधले
धनश्रीदीदींच्या प्रवचनापूर्वी दुपारी एक वाजेच्या सुमारास परिसरात जोरदार पाऊस पडला. यामुळे दलदल निर्माण होऊन मैदान चिखलमय झाले होते. तरीही चिखलाची तमा न बाळगता उपस्थित हजारोंचा स्वाध्यायी परिवार आपापल्या जागेवर शांततेत व शिस्तीत बसून होता. या शिस्तप्रिय स्वाध्यायी परिवाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
रक्षाबंधन उत्सवाप्रसंगी पालकमंत्री संजय सिरसाट, मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, माजी खाजदार चंद्रकांत खैरे, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींनी धनश्रीदीदींचे स्वागत केले.