Rains return to Kannada taluka
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दिवाळीच्या दिवशीच तालुक्यात देवगाव, हतनूर, चापानेरसह आदी भागांत पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या दुःखात भर टाकली आहे. शेतात पाणी साचल्याने उरलेसुरले पिकही वाचले नाही. घोषणा ऐकून दिलासा वाटला होता, पण खात्यावर नुकसानीचे पैसे न आल्याने दिवाळी काळोखी गेली, असे अनेक शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद, मका, कापूस या हंगामी पिकांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. शासनाने पंचनामे करून मदतीची घोषणा केली असली तरी दिवाळीपर्यंतही एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झालेली नाही.
यामुळे मदत थांबली मात्र पाऊस थांबेना अशी स्थिती झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही हतबलतेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनावर विलंबाचा निषेध नोंदवत तातडीने मदत वितरित करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचा सवाल मघोषणांपेक्षा कृती कधी? अतिवृष्टी पावसाने नुकसान झाले यासाठी नुकसानभरपाईची घोषणा ही झाली मात्र मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारीवर दिवाळी कशीबशी साजरी केली घोषणापेक्षा कृती कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली, वीजेचे खांब कोसळले आणि परिसर अंधारात बुडाला. देवगाव रंगारी, ताडपिंपळगाव, देवळाणा, लामणगाव, विटखेडा, चंभारवाडी, देवळी माटेगाव, शेवता, बोरसर, लव्हाळी टाकळी या गावांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला. ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.