Rain falls for third consecutive day in the city; Shekta receives highest rainfall of 66 mm
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणात अधूनमधून रिमझिम तर कधी मुसळधार सरी कोसळत होत्या. शहरात सोमवारी (दि.१८) दिवसभरात २०.६ मिमी तर शेकट्यात सर्वाधिक तब्बल ६६.३ मिमी पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे.
शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, शनिवारी रात्री काही भागांत मुसळधार पावसाने धडक दिली. औरंगपुरा, उस्मानपुरा, सिडको, गजानन महाराज मंदिर परिसरासह नारेगाव, पळशी, सावंगी या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्यावर पाणी साचले.
जुन्या शहरातील नाले तुंबल्याने नागरिकांना वाहतुकीत अडचणींना सामोरे जावे लागले. ग्रामीण भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. पैठण, वैजापूर, खुलताबाद, गंगापूर, फुलंब्री या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. तर शेकट्यात दिवसभरात ६६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरातील सिमेंट रस्त्यांवर पाणी साचून खड्डे व सखल भागांत लहानमोठे तळे तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तर काही भागांत वीज पुरवठाही खंडित झाला होता.
महापालिकेकडून जलनिस्सारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असली तरी काही भागांत नाले तुंबल्यामुळे पाणी उपसा करावा लागला. सततच्या पावसामुळे बाजारपेठांमधील गर्दी कमी झाली असून, उघड्यावर व्यवसाय करणाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे, या पावसामुळे काही भागातील पिके आडवी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच पुढील दोन दिवस शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप सुरू असलेला पाऊस सोमवारी अधून मधून चांगलाच बरसला. दिवसभरात २०.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, शेकट्यात ६६.३ पाऊस पडल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. तापमानात काहीअंशानी घट झाली असून, कमाल २५.४ अंश सेल्सिअस तर किमान २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली आहे.