Raid on gambling den in Millcorner area at Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पोलिस आयुक्तालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर या असलेल्या मिलकॉर्नर भागात खडकेश्वर रस्त्यावर असलेल्या हॉटेल लकी स्टारमध्ये बिनबोभाटपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) छापा मारला. या कारवाईत सुमारे ८० ते ही ९० जुगारींना पकडले. रात्री उशिरापर्यंत जुगारींची नावे आणि मुद्देमाल मोजदाद सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, मिलकॉर्नर भागात खडकेश्वर जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुगार अड्डा चालविला जात असल्याचे आरोप झाले. यापूर्वीही ही पोलिसांनी छापा मारून कारवाई केलेली आहे. तरीही या हॉटेलमध्ये पुन्हा जुगार अड्डा बिनबोभाटपणे सुरू होता.
दरम्यान, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाईच्या सूचना सर्व ठाणेदारांसह गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र कारवाया केल्या जात आहेत. औरंगपुरा भागात काही दिवसांपूर्वीच दोन आणि चिश्तीया चौकात एक असे तीन अड्डे गुन्हे शाखेसह एनडीपीएसच्या पथकाने उद्ध्वस्त केले होते.
त्यानंतर पोलिस आयुक्तालयाच्या अगदी जवळच हॉटेल लकी स्टारमध्ये जुगार खेळविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सिटी चौक ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक फौजफाटा घेऊन हॉटेलमध्ये धडकले.
दंगा काबू पथकाची तुकडी हॉटेल बाहेर तैनात करण्यात आली होती. कारवाईची माहिती मिळताच रस्त्यावर दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी टोळक्याने कारवाईचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या माध्यमाच्या फोटोग्राफरला दमदाटी केल्याने यांची दादागिरी मोठ्याप्रमाणात वाढली असल्याची चर्चा आहे.