Sambhajinagar Crime News : राहुल चाबुकस्वार टोळीची दहशत कायम; प्लॉटसाठी १५ लाखांची मागणी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : राहुल चाबुकस्वार टोळीची दहशत कायम; प्लॉटसाठी १५ लाखांची मागणी

आणखी दोन मर्डर करणे अवघड नाही अशी धमकी; मुकुंदवाडीत चौघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Rahul Chabukswar gang continues to spread terror; demands ₹15 lakh for a plot of land

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोन वेळा 'मोक्का' लावूनही फरार गुंड राहुल चाबुकस्वार टोळीची दहशत कायम आहे. जयभवानीनगरात दोन प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. या भागात राहुल व आम्हाला विचारल्याशिवाय कोणीही प्लॉट खरेदी-विक्री करत नाही. प्लॉट हवा असेल तर १५ लाख रुपये द्या, अन्यथा आणखी दोन मर्डर करणे अवघड नाही, अशी धमकी देत टोळीने दोन मित्रांची कोंडी केली.

याप्रकरणी राहुल साहेबराव चाबुकस्वार, जमीर शेख उर्फ गुड्डू (दोघे रा. हुसेन कॉलनी), श्रीकांत घुले (रा. जयभवानीनगर) आणि प्रमोद ऊर्फ पप्पू सोनकांबळे (रा. न्यू हनुमाननगर) या चौघांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चाबुकस्वार फरार असून अन्य तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

रामनगर येथे कम्प्युटर क्लासेस चालवणारे विकास सोनुने (३३, रा. चिकलठाणा) आणि त्यांचे मित्र विशाल बनकर यांनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी वकील गौतम कर्णे यांच्याकडून जयभवानीनगर येथील प्लॉट क्रमांक २८६ आणि २८७ हे १८ लाखात खरेदी करून करारनामा केला. प्लॉटचा ताबा घेऊन नामफलक लावला. मात्र, १ सप्टेंबर रोजी करबस माळी यांनी फलक काढून काम सुरू केल्याने वाद झाला.

विकास व विशाल यांनी अनुराधा माळी यांच्या मालमत्ता कर आकारणीविरुद्ध महापालिकेत आक्षेप घेतला. १३ ऑक्टोबर रोजी मनपात सुनावणीनंतर रात्री गुड्डू शेख, श्रीकांत घुले आणि पप्पू सोनकांबळे यांनी दोघांना कामगार चौकात बोलावले. राहुल चाबुकस्वार याने पाठवल्याचे सांगत त्यांनी माळी यांच्याकडून प्लॉट खरेदी केल्याचे कागदपत्र दाखवले. यानंतर १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान कामगार चौक व जयभवानीनगरात बोलावून तक्रार मागे घेण्यासाठी व प्लॉट सोडण्यासाठी १५ लाखांची खंडणी मागत हत्येची धमकी दिली. माळी यांनी दत्ता कुबेर यांच्याकडून प्लॉट घेतल्याची बनावट कागदपत्रे तयार करून ती गुड्डू व घुले यांना विकल्याचा संशय आहे.

टोळीवर ४४ हून अधिक गंभीर गुन्हे

राहुल चाबुकस्वार टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, उद्योजक व बिल्डरांना सावकारीच्या जाळ्यात ओढून कोट्यवधींची खंडणी उकळणे, लूटमार आणि जमिनींवर कब्जा असे ४४ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

चाबुकस्वारवर २६, शेख जमीरवर १०, तर घुले आणि सोनकांबळे यांच्यावर प्रत्येकी तीन गुन्हे नोंद आहेत. ऑक्टोबरमध्ये पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी टोळीवर दुसऱ्यांदा मोक्का लावला. तेव्हापासून चाबुकस्वार फरार आहे. मात्र, त्याच्या टोळीकडून खंडणीखोरी सुरूच असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे करीत आहेत.

निर्भयपणे तक्रार करा नमूद आरोपी किंवा अन्य कोणी पैशांसाठी धमकी, दमदाटी, मारहाण, मालमत्ता देण्यास भाग पाडत असेल किंवा खंडणी मागत असल्यास नागिरकांनी थेट माझ्या या २२२६५१४००१ मोबाईल नंबरवर अथवा गुन्हे शाखेकडे निर्भयपणे तक्रार द्यावी, कोणाचीही गय केली जाणार नाही.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT