Rage at liquor shop for Rs 10; Two Left Bloodied in Knife Attack
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारू घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाकडे केवळ १० रुपये कमी असल्याच्या क्षुल्लक कारणावरून आणि येथे राहायचे असेल तर पाच हजार रुपये हप्ता दे या खंडणीच्या मागणीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी व चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. मनपा कार्यालयासमोर मंगळवारी (दि.१२) रात्री ११ वाजेच्या सुमारास हा राडा झाला.
या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर चाकू, लोखंडी पाईप आणि कड्याने हल्ले करण्यात आले असून यात दोघे जण रक्तबंबाळ झाले आहेत. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात फिर्यादी आकाश अशोक रामफळे (२७, रा. टाऊन हॉल) याच्या तक्रारीनुसार, तो आपला मित्र कमलेश चव्हाणसोबत दुकानात दारू घेण्यासाठी गेला होता. आकाशकडे १० रुपये कमी होते. दहा रुपये उद्या सकाळी देतो, असे तो म्हणाला. याचा राग आल्याने आरोपी विक्रेता कृष्णा जैस्वाल याने तुम्ही फुकटे आहात, तुमचे रोजचेच झाले आहे, अशी शिवीगाळ करत आकाशच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्याने त्याचे साथीदार पंपी जैस्वाल आणि अनिकेत अशोक रगडे यांना बोलावून घेतले. तिघांनी मिळून आकाशला पाईप आणि कड्याने बेदम मारहाण केली. कृष्णा जैस्वालने चाकूने आकाशच्या पोटात वार करून त्याला रक्तबंबाळ केले.
येथे राहायचे असेल तर पाच हजार हप्ता दे
दुसऱ्या गटाकडून कृष्णा रामकिशोर जैस्वाल (२८, रा. मालेगाव, ह.मु. मनपा समोर) याने परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी आकाश रामफळे याने कृष्णाच्या घरासमोर येऊन त्याच्या मावशीला येथे राहायचे असेल तर पाच हजार रुपये दे, पैसे नसतील तर हातातील चांदीचे कडे दे अशी खंडणी मागितली.
मावशीने पोलिसांत चल म्हणताच आकाशने चाकू काढून हल्ला चढवला व मावशीच्या डोक्यात चाकूच्या मुठीने मारले. कृष्णा मावशीला वाचवण्यासाठी गेला असता, आकाशने त्याला धक्का देत त्याच्या पोटात चाकू मारला. त्यानंतर आकाशच्या लहान भावानेही तिथे येऊन कृष्णाला मारहाण केली.