Racket involved in black-marketing of fertilizers busted
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
कमी किमतीचे खत नामांकित कंपन्यांच्या बॅगांमध्ये भरून तसेच अनुदानित युरियाचा काळाबाजार करून तो इंडस्ट्रियल ग्रेडच्या नावाखाली चढ्या दराने विकणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा रॅकेटचा कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. दौलताबाद भागातील वंजारवाडी येथील एका गोदामावर शनिवारी (दि.२) मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात तब्बल २६ लाख ६२ हजार ७६२ रुपयांचे ११८.७४ मेट्रिक टन बोगस खत, हजारो रिकाम्या बॅगा आणि पॅकिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी दुपारपर्यंत सुरू होती. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन मारोती निर्फळ (रा. समता कॉलनी, वाळूज), अनिल बालाप्रसाद मंत्री (रा. नांदेड वाघाळा), बालाजी फॉस्फेट लिमिटेड, फेक्टरी (देवास मध्यप्रदेश), गणेश कृषी उद्योग अशी आरोपींची नावे आहेत.
वंजारवाडीत अधाने यांच्या गोदामात बनावट खत पॅकिंगचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी (दि.२) मध्यरात्री गोदामावर छापा टाकला. रविवारी (दि.३) दुपारपर्यंत चाललेल्या या कारवाईत इफ्को, पारादीप, इंडियन पोटॅश, कोरोमंडल, आरसीएफ आदी बड्या कंपन्यांच्या तब्बल १४ हजार ३५५ रिकाम्या छापील बॅगा सापडल्या.
यासोबतच ३२० बॅग लेबलविरहित खत, ५५३ बॅग संशयित पांढरी पावडर, बॅग क्लोजर मशीन आणि दोरे जप्त करण्यात आले. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट व बनावट खत पुरवठ्याचे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी खत निरीक्षक गोविंद पौळ यांच्या तक्रारीवरून दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करीत आहेत.
118 नाट्रिक टन खत जप्त
तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील खत निरीक्षक गोविंद पौळ, भरारी पथकाचे अध्यक्ष तथा खत निरीक्षक आशिष काळुसे यांच्या मार्गदर्शनाखाली खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी पंकज ताजणे, तालुका कृषी अधिकारी मेघश्याम गुळवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हरिभाऊ कातोरे, दिनकर जाधव, रंगनाथ पिसाळ, राधकृष्ण कार्ले यांच्या पथकाने दौलताबाद पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
नांदेडचा व्यावसायिक मुख्य सूत्रधार
पोलिसांनी घटनास्थळावरून सचिन निर्फळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हा सर्व गोरखधंदा नांदेड येथील व्यंकटेश कृषी भांडारचा मालक अनिल मंत्री याच्या सांगण्यावरून करत असल्याची कबुली दिली. मंत्री याच्याकडूनच खत आणि रिकाम्या बॅगा पुरविल्या जात होत्या. मात्र हे खत पुढे कुठे पाठवले जाते, याबाबत त्याने माहिती दिली नाही. खतांचे नमुने नियंत्रण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत
छाप्यादरम्यान आला ट्रक अन् फुटले बिंग
गोदामात कारवाई सुरू असतानाच तिथे एक ट्रक (एमएच-२८ बीबी-७८७८) दाखल झाला. या ट्रकमध्ये बालाजी फॉस्फेट लिमिटेड कंपनीचे ७०० बॅग एसएसपी खत आढळले. कागदपत्रांवर हे खत गणेश कृषी उद्योग, परसोडा यांच्यासाठी असल्याचे नमूद होते. मात्र चौकशीत संबंधित व्यावसायिकाने असे कोणतेही खत मागविले नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून बनावट कागदपत्रांच्या आधारे खताची वाहतूक आणि पुरवठा होत असल्याचे उघड झाले. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.