Sillod Purna River Kolhapuri Dam Collapse Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News | पूर्णा नदीवरील वाहून गेलेला बंधारा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत; नऊ गावांवर पाणीटंचाईचे संकट

सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार व बोरगाव सारवाणी परिसरातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने परिसरातील नऊ गावांचा पाणीप्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Sillod Purna River Kolhapuri Dam Collapse

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार व बोरगाव सारवाणी परिसरातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने परिसरातील नऊ गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नदीचे पाणी अडविता आले नाही.

परिणामी बोरगाव बाजार, बोरगाव सारवाणी, बोरगाव वाडी, सोनप्पावडी, खातखेडा, म्हसला बुद्रुक, म्हसला खुर्द, डोईफोडा आणि पिरोळा या गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही शासन-प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बंधाऱ्याच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यासह शेतीचेही नुकसान

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाणा, देऊळगाव बाजार आणि बोरगाव परिसरात २०२५ च्या पावसाळ्यात अनेकदा अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे पूर्णा नदीला पूर आला आणि नदीने रौद्ररूप धारण केले. पुराच्या पाण्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोरगाव बाजार व बोरगाव सारवाणी परिसरातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा २०२४-२५ मधील अतिवृष्टीदरम्यान वाहून गेला. त्यामुळे नदीकाठच्या गट क्रमांक १३, १४ व १५ यांसह अनेक शेतगटांतील जमिनीची धूप होऊन शेतीचे नुकसान झाले.

पाठपुरावा सुरूच; मात्र दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

वाहून गेलेल्या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी बोरगाव बाजारसह परिसरातील विविध ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी बंधाऱ्याचे काम रखडले असून, पावसाचे पाणी अडविण्याची व्यवस्था निर्माण होऊ शकलेली नाही. याचा थेट परिणाम परिसरातील नऊ गावांच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा?

बंधाऱ्याची दुरुस्ती वेळेत झाली असती, तर पावसाळ्यातील पाणी साठवून परिसरातील गावांना पाणीटंचाईपासून काही प्रमाणात दिलासा देता आला असता. मात्र, दुरुस्तीअभावी पाणीसाठा करण्याची संधी हुकली आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थांकडून बंधाऱ्याची पाहणी; काम सुरू करण्याची मागणी

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या सद्यस्थितीची सरपंच सय्यद सत्तार बागवान, उपसरपंच लक्ष्मण साखरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील टेलर, दत्ता चव्हाण, शेतकरी नंदू चौधरी, महेंद्र चव्हाण, सलीम शहा, संतोष पुरी आणि शाम अधिकार यांनी पाहणी केली. बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून पाणीसाठ्याची व्यवस्था निर्माण करावी आणि नऊ गावांतील नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईतून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

आश्वासन नको, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा!

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे. केवळ आश्वासने देण्याऐवजी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वेळीच दुरुस्ती न झाल्यास नऊ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची जबाबदारी शासन आणि प्रशासनाने स्वीकारावी, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT