Bribery Case : मुकुंदवाडी ठाण्यात पीएसआय ८ हजारांची लाच घेताना पकडला  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Bribery Case : मुकुंदवाडी ठाण्यात पीएसआय ८ हजारांची लाच घेताना पकडला

गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपीच्या भावाकडून घेतले पैसे

पुढारी वृत्तसेवा

PSI caught taking bribe of Rs 8,000 in Mukundwadi police station

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्याच्या बदल्यात त्याच्या भावाकडून ८ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संतोष वसंतराव राऊत (४३, रा. मोरया पार्क, हसूल) याना रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.७) रात्री १० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

अधिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम अन्वये २७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून अटक झाली होती. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक राऊतकडे होता. त्यामुळे तक्रारदाराने गुन्ह्यात मदत करण्याची राऊतकडे विनंती केली. तेव्हा राऊतने दहा हजार रुपये दिले तरच मदत करतो, अशी डिमांड केली. पैसे नसल्याने तक्रारदार निघून आला. मंगळवारी (दि.७) तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली.

रात्री आठ वाजता मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एसीबीच्या पथकाने लाच मागणी पडताळणी केली असता पीएसआय राऊतने डिमांड केल्याचे निष्पन्न झाले. रात्री दहाच्या सुमारास पथकाने ८ हजार घेताना पीएसआय राऊतला रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, वाल्मीक कोरे, जमादार राजेंद्र शिनकर, प्रकाश डोंगरदिवे, बागुल यांच्या पथकाने केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे करत आहेत.

मोबाईलवर ८ हजारांचा आकडा दाखविला

तक्रारदार पीएसआय राऊतकडे गेला तेव्हा त्याने काही कमी करा, मी हातावरला गरीब माणूस आहे, अशी विनवणी केली. तेव्हा राऊतने ८ हजारांचा आकडा मोबाईलवर टाईप करून दाखविला. आठ हजार इकडे सांगितले, अजून लोकात पंचाईत होईल, असे म्हटले.

बाथरूमच्या कोपऱ्यात नेऊन घेतले पैसे

तक्रारदार थोड्या वेळाने पुन्हा पैसे घेऊन ठाण्यात गेला. पीएसआय राऊतने पंचाला बाजूला थांबायला सांगून तक्रारदाराला सोबत घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात गेला. तिथे पैसे घेतले. कोर्टात से पाठवला असून, उद्या वकिलाला सांग आणि जामीन करून घे, पहिले असे म्हटले. तक्रारदाराने केसातून हात फिरवून इशारा करताच पथकाने पीएसआय राऊतला रंगेहात पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT