Sambhajinagar News : जनगणना कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला न्याय द्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : जनगणना कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला न्याय द्या

५० लाखांची मदत व महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीची मागणी : शिष्टमंडळाचे मनपा अधिकाऱ्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Provide justice to the family of the teacher who died while on census duty

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या जन-गणनेचे काम करत असताना शिक्षक किशोर नामदेव समुद्रे यांचा शनिवारी (दि.३०) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षिकांमध्ये खळबळ उडाली असून, शिक्षक समुद्रे यांच्या पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व शिक्षक संबंधित विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहेत. त्यानुसार सोमवारी (दि.१) शिष्टमंडळाने मनपा अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देत मृत शिक्षकाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीची मागणी करण्यात आली आहे.

शहर परिसरात महापालिके अंतर्गत जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध खासगी व शासकीय शाळांतील शिक्षकांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन शिक्षक किशोर नामदेव समुद्रे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, त्यांच्या पत्नीला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, कुटुंबीयांना विम्यासह शैक्षणिक व इतर शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, समुद्रे यांच्या मृत्यूची उच्चस् तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा व चौकशी अहवाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली.

तसेच जनगणना कामासाठी नियुक्त सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, व तीव्र उन्हापासून बचावासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त पिंपळे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून या मागण्या पूर्ण करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाकडे असल्याचे सांगितले.

मृत शिक्षक किशोर समुद्रे यांच्याबाबत शिक्षकांनी दिलेले निवेदन महापालिकेमार्फत शासनाकडे पाठविण्यात येईल. तसेच या संदर्भात शासनाकडे प्रतिनिधित्वही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने लेखी आश्वासनाची मागणी केली. शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबतही त्यांनी माहिती दिली. या वेळी उपायुक्त अपर्णा थेटे यांच्यासह विविध शाळांतील शिक्षक, दिवंगत शिक्षक समुद्रे यांच्या शैक्षणिक संस्थेचे शिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांचे लेखी आश्वासन

अतिरिक्त आयुक्त पिंपळे यांच्या निर्देशानुसार शिष्टमंडळाला लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामध्ये नमूद करण्यात आले की, संबंधित मागण्या पूर्ण करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाकडे आहेत. तसेच शिक्षक किशोर समुद्रे यांच्या प्रकरणी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून आवश्यक प्रतिनिधित्व करण्यात येईल. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT