Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंदोलकांचा शिरकाव; रोहितला न्यायासाठी एल्गार file photo
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंदोलकांचा शिरकाव; रोहितला न्यायासाठी एल्गार

जांबरगाव इंटरचेंजवर पोलिसांनी रोखले; गंगापूर महामार्गावर ठिय्या.

पुढारी वृत्तसेवा

Protesters enter the Samruddhi Expressway; Elgar for justice for Rohit

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : रोहित अनिल पठारे हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आंबेडकरी समाजबांधवांनी रविवारी (दि. २२) समृद्धी महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी दहाच्या सुमारास आंदोलकांनी गंगापूर महामार्गावरून जांबरगाव इंटरचेंजकडे कूच केली. मात्र, इंटरचेंजपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या देत प्रशासनाला जाब विचारला.

रोहित पठारे हत्याप्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशा नऊ मागण्यांचे निवेदन ९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलन करण्यात आले.

आंदोलनस्थळी अपर जिल्हाधिकारी जनार्दन विधाते, आमदार रमेश बोरणारे आणि नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देतानाच गुन्ह्यात आवश्यक कलमांची वाढ आणि पीडित कुटुंबातील एका सदस्याला लवकरच सरकारी नोकरी देण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

काही आंदोलकांचा समृद्धीवर शिरकाव

दरम्यान, पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही काही आंदोलक आणि रोहित पठारे यांचे कुटुंबीय थेट समृद्धी महामार्गावर पोहोचले. तेथे न्यायाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत काही काळ आंदोलन केले. अचानक आंदोलक महामार्गावर पोहोचल्याने पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तत्काळ आंदोलकांना ताब्यात घेऊन महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT