Property worth Rs 1.70 lakhs looted after breaking into house of businessman who went to Igatpuri
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पाहुण्यांना भेटण्यासाठी इगतपुरीला गेलेल्या व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी ९५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (दि.१९) मध्यरात्री सिडको एन ५, पारिजातनगर भागात घडली.
याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तोंडाला रुमाल बांधून आलेला चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मध्यरात्री ३:१४ ला प्रवेश, पहाटे ४ ला त्याने ऐवज घेऊन घरातून पोबारा केला.
जनरल स्टोअर्स चालवणारे सुनील नंदलाल तोतला (५९, रा. प्लॉट नं. २४, पारिजातनगर, एन-५ सिडको) यांच्या तक्रारीनुसार, ते शनिवारी (दि. १९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून इगतपुरी येथे पाहुण्यांना भेटण्यासाठी कुटुंबासह गेले होते. रविवारी (दि. २०) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या परिसरातील वॉचमन राजू राठोड याने त्यांना फोन करून घराचे कुलूप तुटलेले आणि दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच तोतला यांनी नगरसेवक गणेश नावंदर यांना प्रकार सांगितला, ज्यांनी तत्काळ ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. तोतला कुटुंबीय सकाळी साडेआठ वाजता घरी पोहोचले असता, त्यांना मुख्य दरवाजाचा कोयंडा तुटलेला आणि कुलूप बाजूला पडलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहिले असता बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाट उघडे होते आणि सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले.
चोरट्यांनी कपाटातून ९५ हजारांची रोकड, ८ ग्रॅमची सोन्याची चेन, १० ग्रॅमचे गंठण, चांदीचे १ ताट, २ वाट्या, २ ग्लास, १ प्लेट आणि १० चांदीचे कॉईन, एक पेन ड्राईव्ह असा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार मनोहर सोनवणे करत आहेत.
पोलिसांची रात्रगस्त कुचकामी
चोरट्याने टॉमीच्या साहाय्याने दरवाजाचे लॉक उचकटल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मध्यरात्री ३:१४ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हा चोरटा घरात निवांतपणे चोरी करत होता. या घटनेमुळे शहरातील पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.