Saptashrungi Gad Replica : रांजणगावात साकारला सप्तशृंगी गडाचा भव्य देखावा

रांजणगाव येथील श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गावातील श्री संत सावता महाराज मंदिराच्या प्रांगणात श्रीक्षेत्र वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी गडाची तब्बल ५० ते ५५ फूट उंचीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
Saptashrungi Gad Replica
Saptashrungi Gad Replica : रांजणगावात साकारला सप्तशृंगी गडाचा भव्य देखावाfile photo
Published on
Updated on

Grand replica of Saptashrungi Gad created at Ranjangaon

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव येथील श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गावातील श्री संत सावता महाराज मंदिराच्या प्रांगणात श्रीक्षेत्र वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी गडाची तब्बल ५० ते ५५ फूट उंचीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. धार्मिक देखाव्यासोबतच 'जागर स्त्रीशक्तीचा' ही सामाजिक प्रबोधनाची संकल्पना राबविण्यात आली असून, महिलांची सुरक्षा, शिक्षण, आरोग्य व सन्मानाबाबत जनजागृती करणारे संदेश देण्यात आले आहेत.

मंडळाच्या सुमारे ५० सदस्यांनी महिनाभर रात्रंदिवस मेहनत घेऊन हा देखावा साकारला आहे. पोती, लाकडी बल्ल्या, फळ्या, लोखंडी प्लेट, फायबर आदी साहित्याचा कल्पक वापर करण्यात आला आहे. प्रवेशद्वारावर १५ फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती असून, गुहेतून प्रवेश केल्यानंतर भाविकांना सप्तशृंगी गडाची भव्य प्रतिकृती अनुभवता येते.

गडाच्या पायथ्याशी दोन धबधबे, पायऱ्या, रोप-वे आणि सप्तशृंगी मातेचे मंदिर साकारण्यात आले आहे. परिसरात 'स्त्रियांचा सन्मान करा', 'मुलींना शिक्षण द्या', 'मुलींना समान वागणूक द्या', 'महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या' असे संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत.

श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाचे यंदा ३८ वे वर्ष आहे. यापूर्वी अयोध्येतील श्रीराम मंदिर तसेच काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिराचे भव्य देखावे मंडळाने साकारले आहेत. सामाजिक व धार्मिक देखाव्यांसाठी छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाकडून सलग तीन वर्षे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. मंडळाचे सुमारे ५०० सभासद असून, सर्व जाती-धर्मातील पुरुष व महिला सहभागी होतात. देखावा उभारणीचे काम सदस्य स्वतः करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news