Prof Londhe murder case pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Prof Londhe murder case | प्रा. लोंढे खून प्रकरण : तपासात हलगर्जीपणाचा ठाणेदारावर ठपका !

पोलिस निरीक्षक ताटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : निवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे अपहरण आणि खून प्रकरणात हलगर्जीपणा, दिरंगाई आणि संशयितांना पाठीशी घातल्याचा ठपका उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संग्राम ताटे यांच्यावर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. कसूर अहवाल पोलिस आयुक्तांकडे सादर झाला आहे. मात्र १५ मार्चला गुन्हा उघडकीस येऊनही अद्याप प्रशासकीय कारवाई न झाल्याने कुटुंबीय संभ्रमात आहेत. या अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करून कारवाई करावी, अशी मागणी मृत प्रा. लोंढे यांचे बंधू उत्तम लोंढे यांनी केली आहे.

तक्रारदार उत्तम लोंढे यांनी सुरुवातीलाच विशाल राठोड आणि आकाश पवार या संशयितांची नावे पुराव्यानिशी उस्मानपुरा पोलिसांना दिली होती. मात्र पीआय ताटे यांनी तब्बल दीड महिना गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.स्वतःच्याच प्रथम व द्वितीय तपास अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त करूनही त्यांनी तो डावलला. संशयित आरोपींनी मोबाईल डेटा नष्ट केल्याचे व त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे भक्कम पुरावे असतानाही कारवाई केली नाही.

उलट, संशयित आरोपी हे ताटे यांच्या दालनात ५-६ वेळा जाऊन भेटल्याचे सीसीटीव्हीत उघड झाले असून, त्याची रोजनाम्यात कोणतीही नोंद नाही. अखेर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्तक्षेपाने तपासाला गती मिळाली आणि ४० दिवसांनंतर प्रा. लोंढे यांची हत्या करून पुर-लेला मृतदेह बाहेर काढून विशाल राठोड व अन्य दोन साथीदारांना अटक झाली. वेळीच गुन्हा नोंदवला असता तर भावाचे प्राण वाचले असते, असा गंभीर आरोप उत्तम लोंढे यांनी केला आहे.

यापूर्वीही काही प्रकरणांत गंभीर आरोप

सातारा ठाण्यात इन्चार्ज असताना ताटे यांच्यावर महिला विषयक गुन्ह्यात गंभीर आरोप झाल्याने उचलबांगडी झाली होती. दरम्यान, उस्मानपुरा ठाण्यासमोरच एका पोलिसाने झाडाखाली झोपलेल्या नागरिकाला गाडीखाली चिरडले. या प्रकरणातही सीसीटीव्हीत ठाण्याचेच वाहन दिसत असताना एफआयआरमध्ये केवळ सरकारी वाहन अशी नोंद करून लपवाछपवी केल्याचे दिसून आले. त्यानंतर आता प्रा. लोंढे प्रकरणातही गंभीर आरोप झाले.

चौकशी अहवालानुसार कारवाई करू- या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत स्वामी यांना दिले होते. त्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल,
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT