Chatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Crime | गर्भवती विवाहिता जीवन संपवले प्रकरण : फरार पतीला अखेर अटक

अटकपूर्व जामीन फेटाळला; आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : माहेराहून फळ विक्रीच्या व्यवसायासाठी सात लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सततच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून पाच महिन्यांची गर्भवती आएशा बेगम अरबाज शेख (23, रा. अजिंठा, ता. सिल्लोड, ह.मु. हर्सूल) या विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले होते.

याप्रकरणात फरार पती अरबाज सलीम शेख याला अखेर पोलिसांनी अटक केली. अटकपूर्व जामिनासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणी मयत विवाहितेची आई नूरजहाँ बेगम शेख रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती अरबाज, सासू सायरा सलीम शेख व जेठ अलिम सलीम शेख (सर्व रा. भिवंडी, ठाणे) यांच्याविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फुट व्यवसायासाठी सात लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी करत आरोपींकडून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता.

या सततच्या छळाला कंटाळून आएशा बेगम यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पती अरबाज शेख फरार झाला होता. त्याने जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र त्याला दिलासा मिळाला नाही. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अरबाजला अटक केली.

न्यायालयासमोर हजर केले असता त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पुन्हा न्यायालयात हजर केले असता बुधवारी (दि.25) आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी फिर्यादीच्या वतीने ॲड. अरुण डापके, ॲड. महेश राऊतराय, ॲड. चंद्रमणी निसर्गन्ध व ॲड. आकाश बावणे यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT