छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या हायव्होल्टेज निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पहायला मिळत आहे. महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला पहिल्यांदाच मोठा सुरुंग लागला आहे. महाविकास आघाडीतील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने निकालाची दिशा जवळपास स्पष्ट झाले. तेव्हा चिकलठाणा केंद्रावरील वातावरण पूर्णपणे बदलून गेले.
सतीश चव्हाणांसह समर्थकांनी हळूहळू मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. तर डॉ. पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने जमून विजयी जल्लोषाच्या जोरदार तयारी केल्याचे चित्र होते. अखेर चाळीस तासांनतर त्यांनी गुलाल उधळला.
चिकलठाणा येथील मतमोजणी केंद्रावर मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण आणि मविआ राष्ट्रवादीचे डॉ. प्रतापसिंह पाटील या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दीचे केल्याचे चित्र होते. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि उत्कंठा ओसंडून वाहत होती.
दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते निकालाच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून होते. मात्र, जसजशी प्रत्यक्ष मतमोजणी पुढे सरकली आणि डॉ पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे आकडे समोर आले, तसतसे चिकलठाणा केंद्रावरील वातावरणही बदलत होते.
सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या चव्हाण यांची आघाडी पिछाडीवर पडल्याने मतमोजणी केंद्रावर मोठ्या संख्येने जमलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील चलबिचल वाढली. निराश झालेले चव्हाण, त्यांचे मुख्य समर्थक आणि महायुतीचे कार्यकर्ते यांनी चिकलठाणा मतमोजणी केंद्रावरून एक-एक करत काढता पाय घेतला.
तर दुसरीकडे, पाटील यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम ठेवल्याने मविआ समर्थकांमध्ये आनंदाचे उधाण आल्याचे चित्र होते. विजय जवळ आल्याने पाटील यांचे समर्थक घोळक्याने मतमोजणी केंद्राबाहेर जमा झाले. त्यामुळे विजय घोषणा होऊपर्यंत मतमोजणी केंद्र व परिसरात घोषणाबाजी आणि उत्साहाचे वातावरण होते.
धाराशिववरून आलेले समर्थक तळ ठोकून
मंगळवारी सकाळी ७ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. बुधवारी रात्री ९ वाजता म्हणजेच तब्बल ३८ तास उलटूनही मतमोजणी सुरूच होती. त्यामुळे दोन दिवसांपासून बाहेर जिल्ह्यातून आलेले डॉ. पाटील यांचे समर्थक मतमोजणी केंद्रावरच तळ ठोकून होते. धाराशिव येथून आलेले त्यांचे समर्थकांनी रात्रही मतमोजणी केंद्र