प्रतापसिंह पाटील व सतीश चव्हाण  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Graduate Election Result : चव्हाणांचा ‘स्वभाव’ हेच पाटलांच्या विजयाचे ‘सच’!

गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे चव्हाण चौकार मारण्याच्या तयारीत असताना क्लिन बोल्ड झाले.

पुढारी वृत्तसेवा

निवडणूक विश्लेषक : विनोद काकडे

छत्रपती संभाजीनगर : अटीतटीच्या निवडणुकीत अखेर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रतापसिंह पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे चव्हाण चौकार मारण्याच्या तयारीत असताना क्लिन बोल्ड झाले. नवख्या पाटलांनी हा मतदारसंघ सर करण्याचा ‘प्रताप’ साध्य केला. चव्हाणांच्या पराभवामागे अनेक राजकीय कारणे असली, तरी त्यांच्या स्वभावाची चर्चा या निकालानंतर पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळेच चव्हाणांचा ‘स्वभाव’ हेच पाटलांच्या विजयाचे ‘सच’ म्हटल्यास वावगे ठरू नये!

सतीश चव्हाण हे ‘सच’ या टोपणनावाने राजकारणात प्रसिद्ध आहेत. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ २००८ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चव्हाण यांच्या माध्यमातून सर केला. त्यानंतर २०१४ आणि २०२० च्या निवडणुकांतही चव्हाण यांनी विजय मिळवला. गेल्या अठरा वर्षांत राष्ट्रवादीने या मतदारसंघात आपली मजबूत पकड निर्माण केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणातील समीकरणे बदलली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सतीश चव्हाण अजित पवारांसोबत राहिले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेथे पराभव झाल्यानंतर ते पुन्हा अजितदादांच्या गटात परतले. आता पुन्हा पदवीधर निवडणुकीत अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवत ते मैदानात उतरले. राजकीय सोयीनुसार बदलणाऱ्या या भूमिकांमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते.

पवारांनी पेरलं... पवारांनीच नांगर फिरवला!

राष्ट्रवादीतील फुटीनंतर सतीश चव्हाण यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकांचा हिशेब या निवडणुकीत मांडला गेला का, हा प्रश्न आता चर्चेत आहे. तिकिटासाठी इकडून तिकडे जाण्याची त्यांची भूमिका मतदारांना कितपत रुचली, याचे उत्तर निकालातून शोधावे लागेल. मात्र, शरद पवारांची नाराजीही चव्हाणांसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरली असावी. ज्या शरद पवारांनी सतीश चव्हाण यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राजकारणात मोठे केले, त्यांना राजकीय ओळख मिळवून दिली आणि मराठवाड्यातील राजकारणात प्रस्थापित होण्याची संधी दिली, त्यांच्यापासून दूर जाणे आणि पुन्हा त्याच राजकीय वर्तुळात विरोधी बाजूने उभे राहणे, हा साधा राजकीय बदल नव्हता. त्यातच पवारांच्या नाराजीला चव्हाणांच्या स्वभावाची जोड मिळाली.

दादा आणि काकांच्या राजकारणातील मर्जी-नाराजीचे किस्से महाराष्ट्राला नवीन नाहीत. मात्र, राजकारणात ज्यांनी मोठे केले, त्यांच्याशी संबंध बिघडल्याचा परिणाम केवळ पक्षीय पातळीवर होत नाही; तो कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या भूमिकेवरही होऊ शकतो. मराठवाड्यातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील शरद पवारांचे संपर्क लक्षात घेता, या समीकरणाला विशेष महत्त्व प्राप्त होते.

कामे केली; पण माणसे जोडली का?

वास्तविक पाहता, आमदार म्हणून सतीश चव्हाण यांची अठरा वर्षांची कारकीर्द पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांनी अनेक विकासकामे केली आणि पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत मांडले. मात्र, राजकारणात केवळ कामांची यादी विजयाची हमी देत नाही. लोकप्रतिनिधी लोकांशी कसा वागतो, कार्यकर्त्यांना किती महत्त्व देतो आणि सामान्य मतदाराला त्याच्यापर्यंत पोहोचणे किती सहज शक्य होते, यालाही तितकेच महत्त्व असते.

भलेही एखाद्या लोकप्रतिनिधीकडून प्रत्येकाचे काम होऊ शकत नसेल; पण बोलताना मिळणारा सन्मान, अडचणीच्या वेळी दिला जाणारा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांशी ठेवलेला संवाद या गोष्टी राजकारणात मोठी भूमिका बजावतात. काम झाले नाही, तरी समजून सांगणारा नेता लोकांच्या लक्षात राहतो; परंतु काम होऊनही अपमान झाल्याची भावना निर्माण झाली, तर नाराजी मनात साचत जाते.

चव्हाण यांच्या स्वभावाबाबत आणि कार्यपद्धतीबाबत मतदारसंघात नाराजी असल्याची चर्चा होत होती. मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना तडकाफडकी प्रतिक्रिया देणे, लोकांशी अंतर ठेवून वागणे आणि त्यांना अपेक्षित सन्मान न देणे, अशा तक्रारींचा त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला असावा. अर्थात, या नाराजीचा निकालावर नेमका किती परिणाम झाला, हे ठरवण्यासाठी मतदानाच्या आकडेवारीचे विश्लेषण आवश्यक आहे. मात्र, दीर्घकाळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्याच्या कार्यपद्धतीची चर्चा होणे स्वाभाविक आहे.

चौकाराच्या तयारीत असलेल्या चव्हाणांना ‘क्लीन बोल्ड’!

सलग तीन वेळा विजय मिळवल्यानंतर चौथ्यांदा विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या सतीश चव्हाणांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, प्रतापसिंह पाटील यांनी प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान देत विजय मिळवला. या निकालाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. चव्हाणांच्या राजकीय प्रवासातील बदल, शरद पवारांशी निर्माण झालेली दरी आणि त्यांच्या कार्यपद्धतीविषयी व्यक्त होणारी नाराजी या सर्व बाबींची चर्चा या निकालाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. यातील कोणता घटक किती निर्णायक ठरला, याचे उत्तर सविस्तर निकाल विश्लेषणातूनच मिळेल. मात्र, दीर्घकाळ मतदारसंघावर वर्चस्व राखल्यानंतरही विजयाची खात्री देता येत नाही, हा धडा या निवडणुकीने दिला आहे.

अखेरीस, राजकारणात पद मिळवणे आणि ते टिकवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पक्षीय पाठबळ, राजकीय ताकद आणि विकासकामे यांच्या जोरावर नेता मोठा होऊ शकतो; पण त्याचे राजकीय बळ टिकवण्यासाठी कार्यकर्ते आणि मतदार यांच्याशी असलेले संबंध जपावे लागतात. राजकीय समीकरणे बदलतात, पक्ष बदलतात आणि नेत्यांच्या भूमिका बदलतात; मात्र, लोकांच्या मनात निर्माण झालेली नाराजी दूर करणे तितके सोपे नसते.

सतीश चव्हाणांच्या पराभवामागे नेमके कोणते राजकीय गणित चुकले, याची चर्चा पुढेही होईल. पण या निकालाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे, ती म्हणजे, राजकारणात कामे महत्त्वाची असतातच; मात्र, माणसे जोडण्याची कला त्याहून कमी महत्त्वाची नसते. चव्हाणांच्या बाबतीत हाच मुद्दा त्यांच्या पराभवाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आणि म्हणूनच, पाटलांचा ‘प्रताप’ आणि चव्हाणांचा ‘स्वभाव’ हेच या निकालाचे ‘सच’ ठरते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT