Power supply of seven thousand defaulters cut off in Mahavitaran's campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
परिमंडलातील ५ लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत ३०० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात सुमारे ७ हजार थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ५ लाख ९ हजार ७३२ ग्राहकांकडे २९६ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी आहे. छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील १ लाख ३४ हजार ७४१ ग्राहकांकडे ६९ कोटी ६ लाख, ग्रामीण मंडलातील २ लाख ३२ हजार ४९६ ग्राहकांकडे ८४ कोटी ७९ लाख व जालना मंडलातील १ लाख ४२ हजार ४९५ ग्राहकांकडे १४३ कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी आहे.
धडक वसुली मोहिमेत नोव्हेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ५ हजार १५, ग्रामीण मंडलातील ९४२ व जालना मंडलातील ८९३ ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. सुटीच्या दिवशीही ही मोहीम सुरू आहे. सर्व ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे व कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले.
बिल भरण्यासाठी विविध पर्याय
वीज बिल भरण्यासाठी महावितरणने अधिकृत वीज बिल भरणा केंद्रांसह विविध ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. वीज बिलावरील क्यूआर कोड, मोबाईल अॅप, संकेतस्थळ तसेच विविध यूपीआय अॅपद्वारे घरबसल्या ऑनलाईन वीज बिल भरता येते.