

Work on flyover on Kannada National Highway is progressing slowly
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर अंधानेर व विठ्ठलपूर शिवार नजीक सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला संथ गती असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. कामाच्या ठिकाणी योग्य नियोजनाचा अभाव, पर्यायी मार्गांची अकार्यक्षम व्यवस्था आणि सूचना फलकांचा पूर्णतः अभाव या सर्वांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी तर वाढतेच आहे, शिवाय अपघातांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे.
उड्डाणपुलासाठी खोदकाम सुरू असताना वाहतूक व्यवस्थापनात पुरेशी काळजी घेण्यात आलेली दिसत नाही. दोन्ही बाजूंनी वाहतूक चालू ठेवण्याऐ-वजी एकाच बाजूने वाहतूक खेचून नेल्याने या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर अथवा दुसरे वाहन ना नादुरुस्त झाले तर कोंडी निर्माण होते.
महामार्गावरील हा अनागोंदीचा कारभार त्वरित थांबवून कामाला गती द्यावी, सुरक्षितता फलकांची व्यवस्था करावी आणि वाहतूक नियोजन सुध ारावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. कामाचा वेग आणि नियोजनातील निष्काळजीपणा याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे.
विठ्ठलपूर शिवार नजीक शहाराच्या बायपास राष्ट्रीय महामार्ग वरील सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या वळण असलेल्या रस्त्यावर काटेरी झुडपे वाढलेली असून, ती काढण्याची तसदीसुद्धा संबंधित विभागाने घेतली नाही तर रस्त्याच्या कडेला भराव नसल्याने कपारी पडल्या असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे.
नियोजनाचा अभाव
उड्डाणपुलाच्या कामाबाबत ठोस नियोजन नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कामाच्या परिसरात दिशा दर्शविणारे फलक, वेग मर्यादा किंवा धोक्याची सूचना देणारे बोर्ड कुठेच लावलेले दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिक धोकादायक होते. अनेक वाहनचालकांना अचानक अरुंद मार्ग, वळण किंवा दुभाजकासमोर आल्याने तातडीने ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. कामाचा वेग वाढवणे, योग्य पर्यायी मार्ग उभारणे, सूचना फलक लावणे या मूलभूत मागण्या अद्याप अंमलात आलेल्या नाहीत.