Potholes are rampant on the roads of the smart city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटीचा दर्जा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली असून, शहरातील प्रमुख मार्ग औरंगपुरा, मिल कॉर्नर, जालना रोड, गुलमंडी, उस्मानपुरा, बेगमपुरा, सिडको एमआयडीसी परिसर, सिडको आणि आंबेडकरनगर रोड यासह विविध भागांतील रस्त्यांवर मोठमोठी खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहरभर पसरलेल्या या खड्यांच्या साम्राज्यामुळे मनपा प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
शहरातील प्रमुख मार्गांसह विविध भागांतील अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली असून, पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे जलदगतीने सुरू होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र वास्तव याच्या अगदी उलट दिसत आहे. अनेक रस्त्यांवर खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना समोरचा रस्ता दिसणेही कठीण झाले आहे. दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, अपघातांत वाहनांचे नुकसान होत आहे.
शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेला जालना रोड आज खड्यांमुळे जोखमीचा मार्ग ठरला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता सतत वाढत आहे. औरंगपुरा व मिल कॉर्नर परिसरातील परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. काही ठिकाणी रस्ता आहे की खड्डे हेच ओळखता येत नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांनी स्वतःहून खडी-मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्त्यांची डांबरीकरणाची कामे केली जातात, तरी काही महिन्यांतच ती पुन्हा खड्डेमय बनतात.
दर्जेदार डांबरीकरण करा
ठेकेदारांच्या हलगर्जी कामकाजामुळे आणि मनपाच्या देखरेखीअभावी ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्मार्ट सिटीचा विकास फक्त फलकापुरता राहिला आहे. चालण्यासाठीसुद्धा रस्ता शाबूत नाही, अशी प्रतिक्रिया शहरवासीय देत आहेत. शहराची प्रतिमा, नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी दर्जेदार डांबरीकरण करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.