Political earthquake in BJP due to Gutte factor in Gangakhed
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपाने या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची कमांड आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे सोपविल्याने स्थानिक राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. भाजप व आ. गुट्टे यांच्यातील जुने हाडवैर सर्वश्रुत असताना पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपसह विरोधी पक्षांमध्येही चर्चेला उधाण आले.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश विटेकर व आ. गुट्टे यांच्यात वाढलेली जवळीक पाहता दोन्ही नेते ही निवडणूक एकत्र लढवतील, अशी चर्चा होती. मात्र अचानक राजकीय समीकरणे बदलली असून राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असतानाही उमेदवारी न मिळाल्याने असंतोष उफाळून आला आहे.
भाजपाने मतदारसंघातील जि.प. व पं.स.च्या उमेदवार निवडीची संपूर्ण सूत्रे आ. गुट्टे यांच्याकडे दिल्याने अनेक पारंपरिक भाजप कार्यकर्ते व मातब्बर नेते डावलले गेले. काही ठिकाणी गुट्टे समर्थकांना भाजपचे कमळ मिळाले असले तरी, अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त करत उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तसेच इतर पक्षांची वाट धरली. परिणामी भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली असून, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे हे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
भाजपाने गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण कमांड आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे दिल्याने अनेक इच्छुकांची उमेदवारी कात्रीत सापडली. राणीसावरगाव गटातील माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांचे बंधू श्रीनिवास मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली. परिणामी त्यांनी उबाठा शिवसेनेची मशाल हाती घेतली.
महातपुरी व इसाद गटात राजेश फड यांच्या पत्नी सावित्री फड यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण स्वीकारत निवडणूक रिंगणात उडी घेतली. इसाद जिल्हा परिषद गटासाठी संतोष मुरकुटे यांच्या आईचे नाव चर्चेत असताना आ. गुट्टे समर्थक दैवशाला सोपान बडे यांना भाजपच्या कमळावर उमेदवारी देण्यात आली आहे.