Crime News File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पोलिसाला संपवण्याची धमकी

आयुक्तांना सांगून वर्दी उतरवितो; नगरसेवकाच्या नावानेही दमदाटी

पुढारी वृत्तसेवा

Police threatened by driver who obstructed traffic

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भररस्त्यात वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकास विचारणा करणाऱ्या पोलिसांना दोघांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कापून टाकण्याची धमकी दिली.

आम्ही नगरसेवक अझहर पठाण यांची माणसे आहोत. पोलिस आयुक्तांना सांगून तुझी वर्दी उतरवितो म्हणत दोघांनी राडा केला. हा प्रकार बुधवारी (दि.१८) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास हर्मूल टी पॉइंट येथे घडला. याप्रकरणी हसूल पोलिस ठाण्यात क्रुझरचा चालक (एमएच २०-ईई-५३३२) आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हसूल ठाण्याचे गुन्हे शोध पथक चिमनापूरवाडी परिसरात संशयितांचा शोध घेऊन परतत होते. यावेळी हर्सल टी पॉइंट येथील बसथांब्यासमोर एका क्रूझर गाडीच्या चालकाने आपले वाहन रस्त्याच्या मधोमध उभे केले होते.

यामुळे संभाजीनगर ते फुलंब्रीकडे जाणाऱ्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. अंमलदार मोहन सिंगल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडी चालकास वाहन रस्त्याच्या मधोमध उभे करण्याचे कारण विचारले असता, चालकाने उद्धटपणे तुमको क्या करना है, दुसरे काम करो, असे म्हणत हुज्जत घातली. इतक्यावरच न थांबता आम्ही नगरसेवक अझहर पठाण यांची माणसे आहोत, पोलीसवाल्यांची गय करणार नाही, तुमची मस्ती जिरवावी लागेल, अशा शब्दांत त्याने पोलिसांना सुनावले.

त्यानंतर त्याने मी सीपी साहेबांना भेटून तुझी वर्दी उतरवीन, अशी धमकी दिली, तर त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने गाडीतून उतरून तुला चाकूने कापून टाकीन, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर दोघेही आरोपी गाडी रस्त्याच्या कडेला लावून तेथून पसार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार पोपट दहिफळे करत आहेत.

हल्ल्याची चौथी घटना

पोलिसांवर हल्ला केल्याची दोन महिन्यांतील चौथी घटना आहे. हायकोर्ट सिग्नल, छावणी आणि टीव्हीसेंटर भागात घडलेल्या घटना ताज्या असताना आता हसूल टी पॉइंटवर वाहन चालकाने पोलिसांना धमकावून कापून टाकण्याची धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT