Vaijapur News : पोलिसांनाच ठाण्यात शिवीगाळ; वैजापुरातील तणावात भर ! file photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur News : पोलिसांनाच ठाण्यात शिवीगाळ; वैजापुरातील तणावात भर !

तपास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर आंदोलकांचा संताप; शांतता कमिटीची बैठक घेण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

Police themselves abused inside the police station; tension escalates in Vaijapur!

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा रोहित पठारे हत्याकांडाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला आता वेगळेच वळण मिळू लागले आहे. राज्यभरातून विविध संघटना वैजापुरात दाखल होत असताना मंगळवारी (दि. १०) पोलिस ठाण्यासमोर झालेल्या आंदोलनात थेट पोलिसांनाच अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली.

एका विशिष्ट समाजाविषयीही अपशब्द वापरण्यात आल्याने शहरातील सामाजिक वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनात पोलिसांचा अपमान होणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारी भाषा वापरली जाणे, ही गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे. हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत ठिय्या सोडणार नसल्याची भूमिका घेत आंदोलक पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर बसले होते.

यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. काही आंदोलकांनी मुंबईहून येत पोलिसांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. तपास अधिकारी कुठे आहेत, त्यांना समोर आणा, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. अखेर काही आंदोलकांनी बॅरिकेड्स बाजूला सारून पोलिस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला.

पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी जवळपास दोन तास आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर ठाम होते. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, आंदोलनात सहभागी काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांविषयीच्या शिवीगाळीवर नाराजी व्यक्त करत संबंधितांना बाजूला केले.

मात्र, पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसांनाच अपमानास्पद वागणूक मिळूनही कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. भूमिकेवर प्रश्नचिन्ह आंदोलन दुपारपासून सुरू असताना तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी संध्याकाळी आंदोलकांची भेट घेतली. ते तपासाच्या कामासाठी फिरता पंचनामा करण्यास बाहेर असल्याची चर्चा होती.

वेळीच त्यांच्याशी संवाद साधला असता, तर आंदोलनाला हे स्वरूप आले असते का ? परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेऊन आंदोलकांची भेट घेणे अपेक्षित होते. ही बाबही प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करणारी आहे. बैठक तातडीची ! हत्याकांडाच्या निषेधातून आता पोलिसांना शिवीगाळ आणि समाजाविषयी अपशब्दांपर्यंत परिस्थिती पोहोचली आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो. तपास अधिकाऱ्यांनी सर्व बाजूंचा विचार करून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच तातडीने शांतता कमिटीची बैठक घेऊन शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT