Police recruitment death file photo
छत्रपती संभाजीनगर

Police recruitment death: स्वप्न अपूर्णच राहिले! पोलिस भरती चाचणीत धावताना २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Police bharti running test death: लोहमार्ग पोलिस भरतीची शारीरिक चाचणी सुरू असताना, धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Police recruitment death

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिस भरती प्रक्रियेला शनिवारी एका दुर्दैवी घटनेचे गालबोट लागले. लोहमार्ग पोलिस भरतीची शारीरिक चाचणी सुरू असताना, धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. संग्राम शिंदे (वय २३, रा. सांगली) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

धावता धावता अचानक कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत लोहमार्ग पोलिस पदासाठी मैदानी चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातून आलेला संग्राम शिंदे हा तरुण १६०० मीटर धावण्याची चाचणी देत होता. चाचणी पूर्ण करत असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो मैदानावरच कोसळला.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

संग्राम कोसळताच मैदानावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेतली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

भरतीसाठी आलेल्या एका उमद्या तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT