School Admission Festival : खाकी वर्दीतील पोलिस काका-दीदी बनले विद्यार्थ्यांचे सवंगडी file photo
छत्रपती संभाजीनगर

School Admission Festival : खाकी वर्दीतील पोलिस काका-दीदी बनले विद्यार्थ्यांचे सवंगडी

ग्रामीण पोलिसांचा अनोखा शाळा प्रवेशोत्सव ५०८ शाळांत पोलिसांची मांदियाळी

पुढारी वृत्तसेवा

Police officers in khaki uniforms became companions to the students

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्या संपून सोमवारी (दि.१५) जिल्हाभरात शाळांची घंटा वाजली. पहिल्याच दिवशी कुतूहलाने शाळेत पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी यंदा चक्क खाकी वर्दी सज्ज होती.

एरवी पोलिसांची धास्ती घेणारी लहान मुले पोलिस काका आणि दीदींसोबत हसत-खेळत गप्पा मारताना दिसल्याने एक सुखद चित्र पाहायला मिळाले. ग्रामीण पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांशी सलोखा वाढवण्यासाठी जिल्ह्यात हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

जिल्हा पोलिस दलातील ६० अधिकारी आणि तब्बल ४०४ अंमलदारांनी जिल्ह्यातील ५०८ शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचे दिमाखात स्वागत केले. उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणे प्रभारी आणि दामिनी पथकाने यात सहभाग घेतला. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्वतः लाडगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प दिले.

मुलांनी बनवलेल्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या उपक्रमात केवळ स्वागतच झाले नाही, तर पोलिसांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर केली. गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ असणारे पोलिस हे प्रामाणिक मुलांचे 'बेस्ट फ्रेंड' असतात, असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केला.

उपक्रम वर्षभर सुरू राहणार हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, पोलिस काका आणि दीदी नियमितपणे शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. प्रत्येक मुलाने स्वतःला सुरक्षित समजून निर्भयपणे शिक्षण घ्यावे, यासाठी ग्रामीण पोलिस दल कटिबद्ध आहे.
प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT