Police Jalil's house notice in atrocity case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना माजी खा. इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला होता.
जलील यांच्या अटकेची मागणी करत शहरात भव्य मोर्चाही निघाला होता. दरम्यान, शुक्रवारी (दि.४) अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नोटीस बजावण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी गेले होते, मात्र जलील यांनी नोटीस न घेतल्याने पोलिस माघारी फिरले.
अधिक माहितीनुसार, माजी खा. इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यात चौकशीसाठी शनिवारी (दि.५) हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यासाठी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, सिटी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जलील यांच्या घरी गेले होते.
तिथे त्यांनी जलील यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा केली. अॅट्रॉसिटीचे प्रकरण नेमके काय हे पोलिसांनी जलील यांना सांगितले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी शनिवारी हजर राहण्यासाठी लेखी नोटीस देत असताना जलील यांनी नोटीस घेतली नाही, अशी माहिती एसीपी संपत शिंदे यांनी दिली. चौकशीला हजर राहण्याची नोटीस घेतली नसल्याने आता वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाईबाबत ठरवू, असेही एसीपी शिंदे म्हणाले.