Police Commissioner Pawar says that murder attempt charges will be filed against those who steal mangalsutras
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
गुन्हेगारीचे मूळ नशेखोरीत असल्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी एनडीपीएस पथकाला बळ दिले. परिणामी, वर्षभरात तब्बल २८९ कारवाया करत ३१२ तस्करांना जेलमध्ये टाकले. ३ कोटी २० लाखांचे ड्रग्ज, सिरप, बटन, गांजा जप्त केला. मात्र दुसरीकडे खुनाच्या घटनांमध्ये काहीशी घट झाली असली तरी, चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, घरफोडी, तोतयांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
मंगळवारी (दि.३०) पोलिस आयुक्तांनी पोलिस दलाचा वार्षिक गुन्ह्याच्या आकडेवारीचा लेखाजोखा माध्यमांसमोर जाहीर केला. यावेळी डीसीपी रत्नाकर नवले, एसीपी अशोक राजपूत, सुभाष भुजंग, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर आदींची उपस्थिती होती.
पोलिस आयुक्त म्हणाले की, ड्रग्ज तस्करांवर कारवाया यापुढेही सुरूच राहणार असून, त्यांच्या नांग्या ठेचून काढू, ड्रग्ज तस्करांवर परराज्यात पोहोचून कारवाया केल्याने शहर पोलिसांचा दबदबा निर्माण झाला. मंगळसूत्र हिसकावणारे महिलांच्या जीवितास धोका निर्माण करत असल्याने यापुढे अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींवर थेट हत्येच्या प्रयत्नाचेही गुन्हे नोंदविणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. हल्ल्यांमध्ये थेट हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावण्याचे आदेश दिल्यानंतर गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली. ठाण्यांमधील भंगार वाहने महिनाभरात लिलावात व फिर्यादींना परत केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नोव्हेंबरअखेर ५ हजार ९०३ गुन्हे दाखल झाले. त्यामधील ४ हजार ३४१ उघडकीस आले. गतवर्षीच्या तुलनेत २८६ ने गुन्ह्यांची वाढ झाली आहे.
घरफोडीच्या गुन्हांचे डिटेक्शन वाढण्याची गरज
वर्षभरात रात्री १३३ घरफोडीच्या घटना घडल्या. त्यातील केवळ १२ उघड करण्यात पोलिसांना यश आले. दिवसा घडलेल्या ३० घरफोडीच्या घटनांपैकी केवळ १० उघड झाल्या. त्यामुळे घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये डिटेक्शनचे प्रमाण वाढवण्याची गरज पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केली आहे.
फॉरेन्सिक व्हॅन, ई-साक्षप्रणाली दोषसिद्धीसाठी मदतगार
गंभीर गुन्ह्याची संख्या वाढत असताना दुसरीकडे शिक्षेचे प्रमाण मात्र वाढताना दिसत नाही. फिर्यादी, साक्षीदार न्यायालयात फितूर होत असल्याने शिक्षेच्या प्रमाणात घट होत आहे. मात्र आता फॉरेन्सिक व्हॅन आल्यापासून आरोपीविरुद्ध सबळ, परिस्थिजन्य पुरावे मिळविण्यात मोठे साह्य होत आहे. ई-साक्ष प्रणालीमुळे न्यायालयात भक्कमपणे पोलिसांना बाजू मांडता येत असल्याने यापुढे शिक्षेचे प्रमाण नक्कीच वाढेल, असा विश्वास पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केला.
निवडणुकीसाठी पोलिस दल सज्ज
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे. १२६९ मतदान केंद्रांसाठी मोठा फौजफाटा असणार आहे. एसआरपीएफसह राखीव दल होमगार्डची मागणी केली. आहे. समाजकंटकांना शहरात प्रवेश बंदी करण्याचे आदेश दिले आहेत. ९० टक्के शस्त्र जमा झाले आहे. तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाया सुरू असल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.
उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण ठेवण्यात यशस्वी
शहराची पार्श्वभूमी काय यापेक्षा आगामी ५० वर्षांत आपले शहर उद्योगविश्वात उत्तुंग भरारी घेईल. उद्योगांना पोषक, सुरक्षित वातावरण देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत पूर्वीचे पोलिसिंग आता चालत नाही, नवीन आव्हानांनुसार बदल केले जात आहेत. कुख्यात गुन्हेगार आणि गुन्हेगारीकडे वळणाऱ्या नवख्यांचा चांगला बंदोबस्त आम्ही करत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
नशेचा बाजार उठवणारे पथक
पोलिस आयुक्तांनी नशेखोरीचा नायनाट करण्याचा चंग बांधला आहे. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सध्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर, गीता बागवडे या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पथकामध्ये पीएसआय अमोल म्हस्के, लालखान पठाण, संदिपान धर्मे, नितेश सुंदर्डे, महेश उगले, विजय त्रिभुवन, सतीश जाधव, छाया लांडगे यांनी मोठ्या प्रमाणात कारवाया करुन कोटवधींचे अमली पदार्थ पकडून तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुंडांच्या ७ टोळ्यांवर मोक्का
अजय ठाकूर, मुकेश साळवे, रवी जगताप, रवी काळे, फौजल ऊर्फ तेजा, शेख जावेद ऊर्फ टिप्या, सुमित रूपेकर अशा ७कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीतील ४८ सदस्यांवर मोक्का लावला, तर अक्षय वाहूळ, शेख जमीर ऊर्फ कैची, विशाल कजबे, शेख आदिल, रोहित घुले, भीमा साळवे, विद्यावंत भांगे, निशिकांत शिर्के या ८ गुन्हेगारांना एमपीडीएच्या कारवाया केल्या. हर्सल जेलमध्ये राहून हे गुन्हेगार बाहेर येताच पुन्हा गुन्हे करत असल्याने पोलिस आयुक्तांनी त्यांना नागपूर, कोल्हापूर, नाशिक यासारख्या अन्य शहरातील जेलमध्ये स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.
मांजा विक्रेत्यांना दणका
पतंगबाजीसाठी जीवघेणा नायलॉन मांजा विकणाऱ्या २९ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याचे कलम लावून आयुक्तांनी आरोपींना चांगलाच हिसका दाखविला. १३ गुन्ह्यांमध्ये १६८३ मांजाचे रील जप्त केले. राज्यात सर्वाधिक कारवाया केल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.