Ganesh Visarjan : निदान विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते चांगले ठेवा! File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ganesh Visarjan : निदान विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते चांगले ठेवा!

मिरवणूक मार्गाच्या पाहणीनंतर पोलिस आयुक्तांनी सुनावले मनपा शहर अभियतांना खडे बोल

पुढारी वृत्तसेवा

Police Commissioner inspects procession route

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा निदान विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते चांगले ठेवा, असे खडे बोल शुक्रवारी (दि.५) पोलिस आयुक्तांनी महापालिकेचे शहर अभियंता फारुख खान यांना सुनावले. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर शहरातील लाडक्या बप्पाला शनिवारी (दि.६) मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे.

त्यासाठी पवार यांनी मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी मार्गावरील मोठे खड्डे, लोंबकळलेल्या टेलिफोन बायर, केबल आणि एमएसईबीच्या तारा पाहून ते चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमोरच मनपा प्रशासनाची खरडपट्टी काढत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची अशी पद्धत आहे का? निकृष्ट कामाची बिले कशी काढता, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर महापालिकेकडून या मार्गाची पुन्हा डागडुजी सुरू करण्यात आली.

शहरातील खड्डेमय रस्त्यांवरूनच गणरायांचे आगमन झाले होते. दहा दिवसांच्या भक्तीनंतर लाडक्या बाप्पाला शनिवारी निरोप दिला जाणार आहे. दरम्यान गणरायाच्या विसर्जनाची जय्यत तयारी मनपा व पोलिस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मुख्य विसर्जन मिरवणुकीला संस्थान गणपती येथून प्रारंभ होणार असून, शहागंज, सिटी चौक, मच्छली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, महात्मा फुले चौक, जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहीर अशी मिरवणूक जाणार आहे.

या मार्गाची शुक्रवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत मनपाचे शहर अभियंता फारुख खान, अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी बारभुवन-गायकवाड, झोन अधिकारी सविता सोनवणे, रमेश मोरे, संजय सुरडकर, नईम अन्सारी, मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त संजय चांगले, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी आदींची उपस्थिती होती.

या विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत असताना झोन कार्यालयाकडून विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले नसल्याचे दिसून आले. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे पाहताच पोलिस आयुक्तांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी हे खड्डे का बुजविण्यात आले नाही, असे शहर अभियंता फारुख खान यांच्याकडे विचारणा केली. खड्डे बुजविण्याची अशी पद्धत राबवली जाते का? निकृष्ट कामांची बिले कशी दिली जातात? खड्यांतूनच गणरायाला घेऊन जावे का? विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्याची कामे गांभीयनि का केली जात नाही? दहा दिवसांत हे काम का झाले नाही? वरिष्ठांना असा अहवाल पाठवू का? असा संतप्त सवाल करीत मनपा प्रशासनाची खरडपट्टी काढली.

बंद पथदिवे, लोंबकळणाऱ्या तारा

या मार्गाची पाहणी करताना ठिकठिकाणी लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा, केबल, एमएसईबीच्या तारा पाहून पोलिस आयुक्तांनी त्या तारा तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले. तसेच या तारांमुळे अपघात झाला तर सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची व त्या विभागाची असेल, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पथदिवे बंद असून, तातडीने ते सुरू करावेत. विसर्जन मार्गावर हॅलोजन लावण्यात यावे. ठिकठिकाणी अग्निशमन वाहन, विद्युत विभागाचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, जिल्हा परिषद मैदानावर हॅलोजन दिवे लावा, अग्निशमन वाहनासह जनरेटरची व्यवस्था करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

रस्त्यावरच पर्सचे दुकान

या मिरवणूक मार्गावरील सराफा येथे पर्स विक्रेत्याने रस्त्यावरच दुकान थाटले. हे पाहून पोलिस आयुक्त पवार थेट दुकानातच शिरले. दुकानदाराला वारंवार रस्त्यावर दुकान लावू नये, असे सहायक पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. मात्र त्याने कोणाचेही न ऐकता रस्त्यावरच दुकान थाटले. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे संतोष वाहुळे यांनाही काहीच बोलता आले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT