Nylon Manja : पोलिसांनी मांजा विक्रेत्यांच्या गळ्याभोवती आवळला फास File Photo
छत्रपती संभाजीनगर

Nylon Manja : पोलिसांनी मांजा विक्रेत्यांच्या गळ्याभोवती आवळला फास

सप्लायर मुद्दशीरच्या भावाचे ६७२ मांजा चक्रीचे पार्सल जप्त

पुढारी वृत्तसेवा

police arrest nylon manja seller in sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

पतंग विक्रीच्या आडून जीवघेण्या मांजाचा शहरभर पुरवठा करणाऱ्या मुद्दशीर अहमदला बेड्या ठोकल्यानंतर आता त्याचा भाऊ आणि सालाही या गोरखधंद्यात सामील असल्याचे समोर आले आहे. सुरत येथून प्रतीक पाटील या बोगस नावाने मागविण्यात आलेले तब्बल ६७२ मांजाचे पार्सल बुधवारी (दि.१०) गुन्हे शाखेने जप्त केले. महिनाभरापासून मुकुंदवाडी येथील डिलेव्हरी या कुरियरच्या गोदामात हे पार्सल पडून होते. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

समीर अहमद नजीर अहमद (४३, रा. रोशनगेट, आजम कॉलनी) आणि शेख फईम शेख नईम (३३, रा. बाबर कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी रत्नाकर नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मकर संक्रांत जवळ येताच आकाशात उडणारे पतंग पाहून लोकांच्या मनात आनंद नव्हे तर दहशत बसली आहे. काही टवाळखोर जीवघेणा नायलॉन मांजा वापरत असल्याने अनेक निरपराध लोकांचे गळे चिरल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तीन वर्षांच्या मुलाच्या गळ्याला २० टाके पडल्याची घटना समोर येताच पोलिस आक्रमक झाले आहेत. राजाबाजार येथे पतंग विक्रीच्या आडून शहरभरात मांजा सप्लाय करणाऱ्या मुद्दशीर ऊर्फ मुजीब अहमदला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. त्याने पोलिस आयुक्तांच्या बैठकीत उभे राहून धंद्यात अडचणीचा पाढा वाचला होता. त्यानंतर त्याच्याच हातात बेड्या पडल्या.

त्याचे साथीदार शेख फरदीन आणि तालेब खान कडून १९९ चक्री जप्त केल्या होत्या. दरम्यान, मुकुंदवाडी येथील डिलेव्हरी या कुरियरच्या गोदामात महिनाभरापासून पार्सल पडून असून, त्यांना संशय आल्याने त्यांनी पार्सल मागविणाऱ्याचा मोबाईल बंद असल्याचे गुन्हे शाखेला कळविले. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पीएसआय संदीप काळे यांच्या पथकाने पाहणी केल्यानंतर तिथे १२ बॉक्समध्ये ६७२ मांजा चक्री आढळून आल्या. ६ लाख १४ हजारांचे पार्सल जप्त करून समीर आणि फईमने मागविल्याचे तापसात समोर येताच दोघांना अटक करण्यात आली.

आठ दिवसांत दहा जणांच्या टोळीला बेड्या

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेने गेल्या आठ दिवसांत दहा मांजा विक्रेत्यांच्या टोळीला बेड्या ठोकून ९३३ मांजा चक्री जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी सिटी चौक, जिन्सी भागातील आहेत. या टोळीतील कोणाकडे दुकान परवाने असतील तर ते रद्द करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही डीसीपी नवले यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन कंपन्यांना बजावल्या नोटीस

रत्नाकर नवले म्हणाले की, अमेझॉन, इंडियामार्ट, मिशो, मिंत्रा, स्नॅपडिल, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणी मांजा विक्री करत असेल तर ते बंद करावे, अशा स्वरूपाच्या नोटीस संबंधित कंपन्यांना सायबर पोलिसांनी पाठवल्या आहेत. त्यांच्या शहरातील प्रतिनिधींची बैठकही घेऊन सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले-

पालकांनी मुलांवर लक्ष द्यावे नागरिकांनीही आपले मित्र, ● मुले मांजा वापरत असतील तर तो थांबवावा. मुले लहान असतील तर पालकांना, मांजा विक्रेत्यांसह पुरवठादार, ट्रान्सपोर्ट सर्वांनाच आर-ोपी केले जाणार आहे. अजामीनपात्र गुन्हा, अटक होईल आणि जामीनही लवकर होणार नाही. निष्पाप लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही कृती आहे. मांजाचा वापर मुलांना करू देऊ नका. आपले शहर, कुटुंब सुरक्षित करूया.
- रत्नाकर नवले, उपायुक्त, गुन्हे शाखा

बोगस नाव अन् मजुराच्या नावाचे सिमकार्ड गुन्हे शाखेने मोबाईल नंबरची पडताळणी केली तेव्हा ते जाफरादाबाद येथील शेख युनूस या मजुराच्या नावाचे निघाले. त्याने हे सिमकार्ड व्यवसाय करणारा मित्र आरोपी फईमला दिल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीत त्याचे भावजी समीर अहमदकडे हे सिमकार्ड त्याच्या सांगण्यानुसार दिल्याचे सांगितले. समीरला उचलताच त्याने प्रतीक पाटील या बोगस नावाने हे पार्सल सुरत येथून मागविले होते, असे समोर आले.

पोलिसांच्या कारवाईने मांजा विक्रेत्यांमध्ये दहशत

आरोपींनी संशय येऊ नये म्हणून दुसऱ्याच्या नावाचे सिम आणि बोगस नाव वापरून नियोजनबद्ध रीतीने पार्सल मागविले. बाहेर पोलिसांचा धोका असल्याने पार्सल कुरियरच्या गोदामात सुरक्षित राहील म्हणून स्वीकारले नाही, मात्र इकडे पोलिसांनी फास आवळ्याचे कळताच समीरने मोबाईल बंद करून ठेवला होता. पण त्याचे पितळ उघडे पडलेच

सुरतहून पार्सल पाठविणारा कोण?

आरोपी समीरला मांजाचे पार्सल पाठविणारा सुरत येथील पुरवठादार कोण? तो शहरात अन्य कोणाला मांजा सप्लाय करतो, याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या आरोपींच्या नांग्या ठेचायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.

इकडे मुद्दशीरची धिंड, तिकडे भावाला बेड्या

राजाबाजार येथून जीवघेणा मांजा पुरवठा करणाऱ्या मुद्दशीर ऊर्फ मुजीब अहमदला अटक केल्यानंतर बुधवारी सिटी चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, पीएसआय विठ्ठल शिंदे यांच्या पथकाने त्याची राजाबाजार, शहागंज, सिटी चौक भागात येथेच्छ प्रसाद देत धिंड काढली. आरोपी मान खाली घालून अनवाणी पाय रस्त्याने चालत होते. पोलिसांनी त्यांना गुडघ्यावर आणले. तर दुसरीकडे त्याचा भाऊ समीरलाही गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. आता त्याचीही पोलिस चांगलीच बरात काढणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT