PM Kisan's Rs 107 crore deposited in farmers' accounts
राजू वैष्णव
सिल्लोड : शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता ऑनलाईन वितरित करण्यात आला. यात तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या म्हणजे तब्बल ५३ हजार ५८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०७ कोटी १६ लाख रुपये थेट जमा झाले आहे. गेल्या हप्त्याच्या तुलनेत या हप्त्याला १२ हजार ३५० लाभार्थी शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.
तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आधार- बँक लिंक, ई-केवायसी, जमीन रेकॉर्ड दुरुस्ती नव्हती. यामुळे हजारो लाभार्थी शेतकरी या निधीपासून वंचित होते. मात्र दुरुस्ती पूर्ण केल्याने या हप्त्याला १२ हजार ३५० लाभार्थी शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. गेल्या दोन-तीन हप्त्यांत अडकलेले सुमारे १५ हजारांहून अधिक शेतकरी यंदा समाविष्ट झाले आहेत.
गेल्या वेळी तालुक्यातील ई-केवायसी अपूर्ण असल्याने हप्ता अडकला होता. यंदा ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मदतीने सर्व कागदपत्रे दुरुस्त करण्यात आल्याने तालुक्यातील ५३ हजार ५८० शेतकऱ्यांना २१ वा हप्ता मिळाला आहे. हा जिल्ह्यातील सर्वाधिक आकडा असून, उर्वरित जवळपास चार-पाच हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि आधार सीडिंग प्रलंबित आहे.
यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. या कालावधीत ई-केवायसी आणि आधार सीडिंग प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऐन रब्बी हंगामाच्या पेरणीत पीएम किसान योजनेची रक्कम हाती पडल्याने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
दरम्यान सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पावसाने कहर केल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा पुरता हताश झाला होता. प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान झालेल्या ८२ हजार २३५ शेतकऱ्यांसाठी ६९ कोटी ४८ लाखांची मागणी केली होती. यापैकी ६० हजार ९२५ शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी ९६ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर दोन शिवारात शेती, समाईक क्षेत्र तसेच फॉर्मर आयडी नसलेले जवळपास २१ हजार शेतकरी अद्यापही वंचित आहे. वंचित शेतकऱ्यांनी कागदपत्रांची तातडीने पूर्तता करावी, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.
रब्बी हंगामासाठी ४७ कोटींची मदत
अतिवृष्टीच्या मदतीसोबत शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पेरणीसाठीही मदत खात्यात जमा करण्यात आली आहे. ही मदत हेक्टरी १० हजारांची असून, यासाठी ३ हेक्टरची मर्यादा आखण्यात आलेली आहे. आतापर्यंत तालुक्यातील ५८ हजार ८९६ शेतकऱ्यांच्या खात्यात ४७ कोटी ५६ लाख जमा करण्यात आले असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.